सत्ता येऊनही राममंदिर का नाही? : डॉ. तोगडिया

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

माझ्याशी चाय पे चर्चा करा... 
नरेंद्र मोदींना मी मोठा भाऊ मानतो. ज्या वेळी मोदींना गुजरातमध्ये कोणी येऊ देत नसत, त्या वेळी मी त्यांना माझ्या घरी बोलवत असे. विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यालयात नेत होतो. परंतु, 2005 पासून नरेंद्र मोदी आणि माझी चर्चा झाली नाही. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना मोदी भेटतात. मोदींनी माझ्याशीही "चाय पे चर्चा' करावी, यासाठी त्यांना पत्र लिहिले असल्याचे डॉ. तोगडिया यांनी सांगितले. 

पुणे : "राममंदिरप्रश्‍नी न्यायालयाचा निवाडा ऐकण्यासाठी जनतेने भाजपला बहुमत दिलेले नाही. मोदी सत्तेत येऊन चार वर्षे लोटली तरी अयोध्येत राममंदिर उभे राहत नाही. जीएसटीसाठी रात्री बारा वाजता संसद चालू शकते; तर राममंदिरासाठी संसदेत विधेयक मंजूर का करत नाहीत?,'' असा प्रश्‍न विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

तोगडिया म्हणाले, ""तुमच्याकडे बहुमत असल्यामुळे राममंदिरप्रश्‍नी आता कोणतीही सबब चालणार नाही. न्यायालयाच्या निर्णयानुसार मंदिर करायचे होते, तर आंदोलन का केले?, आंदोलनात लाखोंचे बळी गेले, काहीजण कारागृहात गेले. न्यायालयाने राममंदिराबाबत हिंदूंना अपेक्षित निर्णय दिल्यास बाजूलाच बाबरी मशीद तयार होईल. रामाच्या जन्मभूमीत बाबरची मशीद तयार होण्यास देशातील कोणतीही व्यक्ती तयार नाही. हिंदूंचा संयम संपत आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ कायदा करून अयोध्येत राममंदिर करावे. तिथे बाबरी मशीद होणे, मान्य नाही. भाजप सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे झाली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराचा प्रश्‍न मार्गी लावला नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा पराभव झाला.'' 

निर्णयासाठी माझ्यावर दबाव 
राममंदिरासाठी गेली 32 वर्षे लढा सुरू आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानुसारच राममंदिराचा निर्णय स्वीकारा, यासाठी माझ्यावर सत्तेतील काही व्यक्तींकडून दबाव टाकला जात असल्याचेही डॉ. तोगडिया यांनी सांगितले. 

माझ्याशी चाय पे चर्चा करा... 
नरेंद्र मोदींना मी मोठा भाऊ मानतो. ज्या वेळी मोदींना गुजरातमध्ये कोणी येऊ देत नसत, त्या वेळी मी त्यांना माझ्या घरी बोलवत असे. विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यालयात नेत होतो. परंतु, 2005 पासून नरेंद्र मोदी आणि माझी चर्चा झाली नाही. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना मोदी भेटतात. मोदींनी माझ्याशीही "चाय पे चर्चा' करावी, यासाठी त्यांना पत्र लिहिले असल्याचे डॉ. तोगडिया यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा 
केंद्र सरकारच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तीन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये कापसाला प्रतिक्विंटलला सहा हजार रुपये मिळणारा भाव तीन-चार हजारांवर आला आहे. देशातील शेतकरी कर्जबाजारी झाला असून आत्महत्येच्या घटना घडत आहेत. सध्या शेतकरी "आयसीयू'मध्ये आहे. त्यामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. तसेच, सर्व पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, अशी मागणी डॉ. तोगडिया यांनी केली. 
 

Web Title: Pravin Togdia criticize Narendra Modi government on Ram Mandir issue