प्रयेजा सिटीजवळील पुलाची दुरुस्ती कधी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन
धायरी - वारजे व सनसिटीकडे जाणारा प्रयेजा सिटी येथील पूल तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.पूल वाहून गेल्याने सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना नवले पुलापासून नऱ्हेमार्गे बाह्यवळणाकडे जावे लागते. त्यामुळे सनसिटी, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द, धायरी, नांदेड सिटी या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी खडकवासला शिवसेना विभागप्रमुख महेश पोकळे यांनी केली.

सिंहगड रस्ता - महामार्ग, सिंहगड रस्ता, नांदेड सिटी परिसराला जोडणारा पूल वाहून गेल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सुमारे एक महिन्यापूर्वी हा पूल वाहून गेला; मात्र अद्यापही त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांच्या गैरसोयीत मोठी वाढ झाली आहे.

सनसिटी परिसर आणि प्रयेजा सिटी यांच्यामधून जाणाऱ्या मुंबई-बंगरुळ महामार्गालगत सेवा रस्त्यांना जोडणारा पूल २५ सप्टेंबरच्या पावसात वाहून गेला. विशेष म्हणजे येथेच पाण्यात वाहून गेल्याने एका महिलेचादेखील मृत्यू झाला होता. असे असले तरीही प्रशासनाने मात्र कोणतेही पाऊल उचललेले नाही.

वडगावमधील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मधुकोष, नांदेड सिटी या भागातील सर्व नागरिकांना हिंजवडी, मुंबई, साताऱ्याला जाण्यासाठी हा पूल दुवा होता. या पुलामुळे सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होत होती; मात्र पूलच वाहून गेल्याने नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सोबतच या सगळ्याचा ताण सिंहगड रस्त्यावर येतो. सनसिटी भागातून नांदेड सिटी, सिंहगडाच्या दिशेने जाण्यासाठी हा जवळचा मार्ग होता. यापूर्वीही रस्ता नसल्याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. त्यानंतर हा रस्ता दुरुस्त करण्यात आला. तत्कालीन नगरसेवक विकास दांगट यांनी हा पूल दुरुस्त करून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्या वेळी खासदार सुप्रिया सुळे आणि विकास दांगट यांनी सहपाहाणी केली होती. 

यंदा पुण्यात झालेल्या ढगफुटीच्या पावसाने हा पुल तर वाहून गेलाच; सोबत एका महिलेचादेखील मृत्यू झाला; मात्र एक महिना उलटून गेल्यानंतरही पूल अद्याप दुरुस्त झालेला नाही. नगरसेवक प्रसन्न जगताप म्हणाले, ‘पूल तयार करण्याच्या कामास सुरवात झाली असून, येत्या दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल.’

पुलाचे काम सुरू झाले असून, लवकरच काम पूर्ण होऊन तो नागरिक आणि वाहनांसाठी खुला होणार आहे. 
- अनिरुद्ध पावसकर, अभियंता, पथ विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prayeja City Bridge Repairing Issue