प्रयेजा सिटीला सिमेंटच्या प्रदूषणाचा विळखा

वडगाव खुर्द - रेडिमिक्‍स सिमेंटच्या धोकादायक वाहतुकीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
वडगाव खुर्द - रेडिमिक्‍स सिमेंटच्या धोकादायक वाहतुकीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

आनंदनगर - सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव खुर्दजवळील प्रयेजा सिटी व देवीआईनगर परिसरातील हजारो नागरिक रेडिमिक्‍स सिमेंटद्वारे होणाऱ्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत. परिसरातील एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर सिमेंट सांडून धुळीचे लोट पसरले आहेत. संबंधित गाड्यांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

वडगाव खुर्द यथील देवीआईनगर परिसरात रेडिमिक्‍स सिमेंटच्या काही लहान मोठ्या कंपन्या व प्लांट आहेत. येथून दररोज सिमेंट, खडी, रेडिमिक्‍स ट्रकची वाहतूक होत असते. शंभरहून अधिक रेडिमिक्‍स ट्रकमुळे परिसरात सिमेंटचे धुळीचे लोट पसरतात. रेडमिक्स ट्रकमधून रस्त्यावर पडणारे रेडिमिक्‍स व वाहतूक करणाऱ्या सिमेंट टेंपोमुळे सिमेंटचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना श्वसना, घशासंबंधीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. पूर्ण घरात सिमेंटच्या धुळीमुळे अन्न-पाण्यातदेखील सिमेंट मिसळले जात आहे. काही दिवसांपूर्वीच येथील स्थानिक नागरिकांनी या सिमेंट वाहतुकीसंदर्भात व प्रदूषणासंदर्भात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले होते; परंतु प्रशासन दरबारी व या कंपन्यांनी वाहतूक चालूच ठेवल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व संतापही व्यक्त होत आहे.       

सतत होणाऱ्या या वाहतुकीमुळे पांढरे धुळीचे लोट परिसरात पाहावयास मिळतात. या मार्गावरून नागरिकांना वाहन चालवताना व पादचाऱ्यांना त्रास होत आहे. या वाहतुकीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. हे रेडिमिक्‍स ट्रक प्रमाणापेक्षा जास्त न भरता व त्यातील सिमेंट जमिनीवर पडणार नाही, याची काळजी या प्लांट व वाहनचालकांनी घेणे गरजेचे आहे. ही वाहने अतिवेगाने वाहतूक करतात. त्यावरही नियंत्रण असणे आवश्‍यक आहे. नाहीतर मोठा अपघात होण्याची शक्‍यतादेखील नकारता येत नाही.

अन्ना-पाण्यात सिमेंटचे कण
गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून या भागात वाहतूक करणाऱ्या या रेडिमिक्‍स सिमेंट ट्रक व सिमेंटच्या वाहतुकीमुळे आम्हाला अशुद्ध हवा घ्यावी लागत आहे. प्रचंड प्रमाणात सिमेंटच्या धुळीचे लोट दिवस-रात्र परिसरातील हवेत असतात. नाकाला रुमाल लावून, नाक दाबून मला घराच्या बाहेर पडावे लागते. खिडक्‍या दरवाजे बंद करून घरात बसावे लागत आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करूनदेखील या वाहतुकीवर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर नागरिकांनी दिली.

प्रश्‍न अडकला हद्दीत 
प्रयेजा सिटी ते सनसिटी हा रस्ता दोन प्रभागांमधून जातो, त्यामुळे या रस्त्याला आठ नगरसेवक आहेत. रस्त्याची दुरवस्था तसेच रेडिमिक्स काँक्रीटमुळे होणारे प्रदूषण याकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष हाेत आहे, यामुळे येथील नागरिक संताप व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com