पिंपरी शहरात मॉन्सूनपूर्व पावसाची गारांसह हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

पिंपरी - शहर परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीननंतर मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागांत पाणी साचले. वादळामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली. दुचाकीस्वार व पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी पावसाबरोबर गाराही पडल्याने टेरेस गार्डन, नर्सरी व फळझाडांचे नुकसान झाले. मात्र, गारा वेचून खान्याचा आनंद अनेकांनी लुटला.  

शुक्रवारी सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. दुपारनंतर आकाशात ढग दिसू लागले. मात्र, उकाडा कायम होता. साडेतीननंतर जोरदार वारा व पाठोपाठ पावसाला सुरवात झाली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

पिंपरी - शहर परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीननंतर मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागांत पाणी साचले. वादळामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली. दुचाकीस्वार व पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी पावसाबरोबर गाराही पडल्याने टेरेस गार्डन, नर्सरी व फळझाडांचे नुकसान झाले. मात्र, गारा वेचून खान्याचा आनंद अनेकांनी लुटला.  

शुक्रवारी सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. दुपारनंतर आकाशात ढग दिसू लागले. मात्र, उकाडा कायम होता. साडेतीननंतर जोरदार वारा व पाठोपाठ पावसाला सुरवात झाली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

महामार्गावर झाडे कोसळली
पुणे-नाशिक महामार्गावर कासारवाडीत केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेजवळ (सीआयआरटी), पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट पुलानजीक व आयसीसी कंपनीजवळ आणि डेअरी फार्म रस्त्यावर झाड कोसळले होते. पिंपरी चौक ते स्टेशन रस्ता, चोविसावाडी, मोशी आदी ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या होत्या. पिंपरी कॅम्पातील साई चौकातील भुयारी मार्गावरही झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

फळझाडांचे नुकसान 
वादळ आणि पावसामुळे झाडावरील कैऱ्या पडल्या. अशी स्थिती प्राधिकरण, पिंपरी, चिंचवड, भोसरी या शहरी भागासह चऱ्होली, मोशी, चिखली, रावेत, किवळे, पुनावळे, मामुर्डी, पिंपळे गुरव आदी भागात होती. घराच्या परिसरात फळझाडे लावलेली आहेत. त्यासह टेरेस गार्डनचेही नुकसान झाले. 

मुलांनी लुटला आनंद
अनेक ठिकाणी मुलांनी पावसात भिजण्याचा आणि गारा वेचण्याचा आनंद लुटला. पिंपरी चौकानजीक व एचएच्या मैदानावर मुले क्रिकेट खेळताना दिसली.

येथे साचले पाणी
पिंपरी गावातील अशोक थिएटर परिसर, पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक, शंकरवाडीतील लोहमार्ग व वल्लभनगर भुयारी मार्गात पाणी साचले होते. मोशी-चिखली रस्त्यालगतची रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज सोसायटी आदी भागातील कच्चे रस्ते चिखलमय झाले होते. 

जाहिरात फलक कोसळले
शुक्रवार, एक जून अनेकांचा वाढदिवस होता. चौकाचौकांत शुभेच्छा फलक लावलेले होते. मात्र, वादळ व पावसामुळे काही फलक फाटले, तर काही उन्मळून पडले. 

महामार्गही झाला संथ
जोरदार पावसामुळे किवळे ते सूस यादरम्यान महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती. पुढे रस्ता दिसत नसल्याने बहुतांश वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला थांबणे पसंत केले. या अंतरात दोन वाहने बंद पडल्याने महामार्गावर असलेल्या वाहनांची कोंडी झाली.

व्यापाऱ्यांची धांदल
देहू - देहू परिसरात पावसाने दुपारी साडेतीन वाजता हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या पावसाने देहूरोड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची धांदल उडाली. तर काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला.

वाहनचालकांची कसरत
भोसरी : येथील दिघी रस्त्यावरील बन्सल सिटी, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाची सीमाभिंत, पीएमटी चौक, पीसीएमटी चौक, गावठाणातील मारुती मंदिर, लांडेवाडीतील साईधाम रुग्णालयासमोरील रस्ता, अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, चक्रपाणी वसाहत रस्ता आदी भागांत पावसाचे पाणी साचले होते.

सांगवीत हाल
जुनी सांगवी : येथील मुळा नदी किनाऱ्याकडील रस्त्यांवर पाणी साचले होते. रस्ते निर्मनुष्य झाले होते. मंडई व बाजारपेठेत नागरिकांची धावपळ उडाली. मात्र, उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला.

Web Title: Pre-monsoon rain in Pimpri city