बारामतीतील रस्त्यावर गर्भवती वेदनेने कळवळत होती... 

मिलिंद संगई
Tuesday, 26 May 2020

बारामती शहरातील रस्त्यावर एक टेंपो आलेला असतो, टेंपोतील लोक मदतीसाठी याचना करत असतात....त्यात एक गर्भवती वेदनेने कळवळत होती..

बारामती (पुणे) : बारामती शहरातील रस्त्यावर एक टेंपो आलेला असतो, टेंपोतील लोक मदतीसाठी याचना करत असतात....त्यात एक गर्भवती वेदनेने कळवळत होती...तिला तातडीने दवाखान्यात जायची आवश्‍यकता होती, तिला कळा सुरू होतील, अशी स्थिती होती...मात्र दवाखान्यात तिला दाखल करुन घ्यायला कुणी तयार नाही...अशा परिस्थितीत नेमके काय करायचे, ते समजत नव्हते... 

अशातच एका संवेदनशील मनाच्या महिलेने हे दृश्‍य पाहिले, अन्‌ तातडीने त्यांना शासकीय महिला रुग्णालयात नेण्याचे सुचविले. त्यांचा सल्ला त्यांनी ऐकला. त्या महिलेला तेथे वेळेवर उपचार मिळाले आणि तिचे प्राण वाचले. तसेच, शिवाय छानशा बाळालाही तिने जन्म दिला. बारामतीतील अल्पा नितीन भंडारी या त्या देवदूत बनून आलेल्या महिलेचे नाव. 

मुंबईकरांमुळे पुणेकरांना धोका, कोरोनाचा सुरू आहे मुंबई- पुणे- मुंबई प्रवास 

कोरोनामुळे लोक परस्परांच्या संपर्कात येण्यासही कचरत आहेत. अशा स्थितीत शनिवारी अल्पा भंडारी या फिरायला निघाल्या होत्या. त्यावेळी एका टेंपोत इंदापूर तालुक्‍यातील बोरी काझड येथून टेंपोतून एका गर्भवतीला बारामतीत आणले होते. खासगी दवाखान्यात त्यांना घेतले जात नसल्याने व त्यांची अवस्था बिकट झाल्याचे पाहून अल्पा भंडारी यांनी त्यांना तातडीने महिला रुग्णालयामध्ये नेण्यास सांगितले. शासकीय महिला रुग्णालयात मात्र या महिलेला तातडीने दाखल करुन घेतले गेले आणि मंगळवारी तिला छानस बाळ देखील झाले. या शासकीय रुग्णालयात विनामूल्य सर्व उपचार व सुविधा संबंधित महिलेला मिळाल्या. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामतीत महिला शासकीय रुग्णालयाची सुविधा निर्माण करण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यामुळे महिलांची मोठी सोय झाली. या रुग्णालयामुळे सर्वच सुविधा मोफत मिळतात, तसेच सेवाही तत्पर मिळते. पवार यांच्या दूरदृष्टीने अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा या रुग्णालयाच्या माध्यमातून मिळाला आहे. 
- अल्पा भंडारी, बारामती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pregnant woman was crying in pain on the road in Baramati