esakal | का दाटे अंधार भवता..? 
sakal

बोलून बातमी शोधा

का दाटे अंधार भवता..? 

वेळेआधी होणारा जन्म (प्री-मॅच्युअर) यातच अंधत्वाचे मूळ असल्याचा धक्कादायक निष्कर्ष राज्यातील अंधशाळांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे.

का दाटे अंधार भवता..? 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - वेळेआधी होणारा जन्म (प्री-मॅच्युअर) यातच अंधत्वाचे मूळ असल्याचा धक्कादायक निष्कर्ष राज्यातील अंधशाळांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे. अशा मुलांमध्ये जन्मत- रेटिनोपॅथी ऑफप्रिमॅच्युरिटी (आरओपी) हा आजार असण्याची शक्‍यता जास्त असते. त्यातूनच या मुलांच्या वाट्याला अंधत्व येते. तथापि, वेळेत योग्य उपचार मिळाल्यास या आजारातून काहींची सुटका होऊ शकते, असेही अहवालात म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांची समिती आणि बजाज फायनान्स कंपनीच्या आर्थिक साहाय्याने हे संशोधन करण्यात आले. यात लहान मुलांच्या अंधत्वाच्या कारणांत समाजाच्या आर्थिक स्तरानुसार बदल होत असल्याचे पुढे आले. 

संशोधक डॉ. सुचेता कुलकर्णी म्हणाल्या, ""सरकारने गर्भवती महिलांना "अ' जीवनसत्त्व देण्याच्या योजनेला यश मिळाले आहे. पण सरकारने आता "आरओपी'ने येणारे अंधत्व टाळण्यासाठी उपाय योजना करायला हव्यात.'' 

अहवालावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता. 18) एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या लंडनमधील समन्वयक प्रा. क्‍लेअर गिलबर्ट, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील डॉ. प्रोमिला गुप्ता, राज्यातील आरोग्य अधिकारी आदी बैठकीस उपस्थित असतील, अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली. 

हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक कर्नल मदन देशपांडे म्हणाले, ""लहान मुलांच्या अंधत्वाची कारणे ही देशाची आरोग्यप्रणाली आणि आर्थिक प्रगतीची निदर्शक आहेत. जसे, प्रगत देशातील लोकांच्या मेंदूला प्राणवायूच्या कमतरतेने येणारे अंधत्वाचे प्रमाण जास्त आहे. तसेच, आफ्रिकन देशात "अ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे येणारे अंधत्वाचे प्रमाण जास्त आहे, जे आपण टाळू शकतो.'' 

प्रत्येक तिसऱ्या मुलाचे (32 टक्के) अंधत्वाचे कारण हे उपचाराने बरे होणारे आहे, त्यासाठी मोतीबिंदू आणि "आरओपी' या आजाराचे निदान व उपचारासाठी जास्तीत जास्त तज्ज्ञ डॉक्‍टर प्रशिक्षित करणे आणि सुधारित उपकरणे देणे गरजेचे आहे. 
- डॉ. सुचेता कुलकर्णी 

सर्वेक्षण दृष्टिक्षेपात 
- राज्यातील 53 अंधशाळांपैकी 39 शाळांची तपासणी 
- गेल्या वर्षी दोन हजार मुलांची तपासणी 
- पाच ते 17 वयोगटातील मुले 
- यातील 15 टक्के मुले ही पूर्णपणे अंध नव्हती. 

सर्वेक्षणातील अंधत्वाची कारणे - प्रमाण 
जन्मत- अविकसित डोळा - 47 टक्के 
बुबुळाचे आजार - 15 टक्के 
बुबुळामागच्या पडद्याचे आजार - 15 टक्के 
मोतीबिंदू - 7 टक्के 
इतर - 16 टक्के 

loading image