आंदोलनकर्त्यांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

पिंपरी - प्रेमलोक पार्क येथील शाळेचे स्थलांतर दळवीनगर परिसरातील नवीन इमारतीमध्ये करण्यात आले. मात्र नवीन शाळेत येताना पालक व विद्यार्थ्यांची रस्त्यातच अडवणूक केली जाते. त्यांना दमदाटीही केली जाते. यामुळे सोमवारी शाळेत अवघी १४ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

पिंपरी - प्रेमलोक पार्क येथील शाळेचे स्थलांतर दळवीनगर परिसरातील नवीन इमारतीमध्ये करण्यात आले. मात्र नवीन शाळेत येताना पालक व विद्यार्थ्यांची रस्त्यातच अडवणूक केली जाते. त्यांना दमदाटीही केली जाते. यामुळे सोमवारी शाळेत अवघी १४ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

प्रेमलोक पार्क येथील शाळेची इमारत महापालिकेने पोलिस आयुक्‍तालयासाठी दिली. त्यामुळे येथील शाळेचे स्थलांतर दळवीनगर येथील नवीन इमारतीमध्ये केले आहे. याबाबत काही पालकांनी आंदोलनाची भूमिका घेतली. त्यांनी गेले आठवडाभर शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले. रविवारी महापालिकेने प्रेमलोक पार्क येथील शाळेचे साहित्य नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित केले. मात्र त्यानंतरही काही पालकांनी आंदोलन सुरूच ठेवले.

सोमवारी (ता. १८) दळवीनगर येथील नवीन शाळेत काही पालक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन आले. मात्र काही आंदोलनकर्ते पालक सकाळी अकरा वाजल्यापासून शाळेकडे येणाऱ्या मार्गावर उभे होते. दळवीनगर येथील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बळजबरीने प्रेमलोक पार्क येथील शाळेत पाठविण्यात येत होते. काही पालकांना धक्‍काबुक्‍कीही करण्यात आली.

दळवीनगर येथील शाळेची इमारत प्रशस्त असून, त्यामध्ये स्वतंत्र संगणक कक्ष आणि ग्रंथालयदेखील आहे. शाळेभोवती पटांगण असून, सीमाभिंतही बांधण्यात आली आहे. मात्र, आम्हाला प्रेमलोक पार्कमध्येच शाळा हवी, अशी आग्रही भूमिका ठराविक पालकांनी घेतली आहे. यामुळे इतर मुलांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. 

शाळेत जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. विद्यार्थी आणि पालकांची कोणी अडवणूक करण्याबाबत महापालिकेकडून विनंती झाल्यास योग्य तो बंदोबस्त करू. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही.
- विठ्ठल कुबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिंचवड पोलिस ठाणे

विद्यार्थी आणि पालक यांना अडविण्यात येत असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे. याबाबत पोलिसांना पत्र दिले जाणार आहे.
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ

Web Title: premlok park school migration student agitation