निविदा तयार करतानाच भ्रष्टाचार - लक्ष्मण जगताप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

पिंपरी - ‘आम्ही निवडणुकीच्या वेळीच नव्हे, तर वेळोवेळी भ्रष्टाचाराविरोधात बोललो आहोत. विकासकामांच्या निविदांसाठी मूळ रकमा कोण निश्‍चित करते ? असा प्रश्‍न उपस्थित करून निविदा करताना भ्रष्टाचार होत आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ‘पुणे मेट्रो’ सेवा निगडीच नव्हे, तर चाकण-हिंजवडीपर्यंत नेण्याचा विचार आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरू होण्याबाबत मुख्यमंत्री पातळीवर चर्चा चालू असून, आचार संहितेपूर्वी त्यासंदर्भात घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी - ‘आम्ही निवडणुकीच्या वेळीच नव्हे, तर वेळोवेळी भ्रष्टाचाराविरोधात बोललो आहोत. विकासकामांच्या निविदांसाठी मूळ रकमा कोण निश्‍चित करते ? असा प्रश्‍न उपस्थित करून निविदा करताना भ्रष्टाचार होत आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ‘पुणे मेट्रो’ सेवा निगडीच नव्हे, तर चाकण-हिंजवडीपर्यंत नेण्याचा विचार आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरू होण्याबाबत मुख्यमंत्री पातळीवर चर्चा चालू असून, आचार संहितेपूर्वी त्यासंदर्भात घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अरबी समुद्रातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित स्मारकाचे शनिवारी (ता.२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवडसह देशभरातील प्रमुख नद्यांचे जल आणि मृदा मंगलकलशामधून तेथे नेले जाणार आहे. त्यासंदर्भात  आयोजित पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते. खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, प्रदेश सचिव उमा खापरे आदी उपस्थित होते.

... तर राजकारण सोडेन !      
जगताप म्हणाले, ‘‘भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होण्यास वर्षभराचा काळ जातो. मी भ्रष्टाचारी आहे असा आरोप सत्ताधारी करीत आहेत. तसे आढळले तर मी भाजपच नव्हे, तर राजकारणही सोडेन. ‘पुणे मेट्रो’चा पहिला टप्पा अनेक वर्षांपूर्वी निश्‍चित झाला आहे. आता, मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी करणे म्हणजे त्याला ‘खो’ घातल्या सारखे होईल.’’ राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या १० वर्षांपासून ‘बीआरटी’ सेवा देता आली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  

शास्तीकराचा निर्णय पुढील आठवड्यात
शास्तीकराच्या बाबतीत पुढील आठवड्यात गोड बातमी समजेल, असे सांगून जगताप यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मिळकतधारकांना दिलासा दिला. पवना बंदिस्त जलवाहिनीसंदर्भात ते म्हणाले, ‘‘पवना जलवाहिनीच्या कामासाठी चालू निविदाच कायम ठेवायची किंवा ती मागे घेऊन नवीन निविदा काढायची ? यावर विचार केला जाईल. या जलवाहिनीमधून आजूबाजूच्या गावांनाही पाणी देण्याचे विचाराधीन आहे. पिंपळे सौदागर येथील विकासकामाचे आम्ही ३ आठवड्यांपूर्वी भूमिपूजन केले. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपूर्ण आणि पूर्ण झालेल्या कामांची उद्‌घाटने केली जात आहेत. अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न न्यायप्रविष्ट आहे.’’   

पिंपरी-चिंचवड परिसरातील चारही नद्यांतील पाणी आणि मृदा उद्या गुरुवारी (ता.२२) कलशामध्ये जमा केली जाईल. तसेच शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्ते त्यांना वंदन करतील. शुक्रवारी (ता.२३) मंडल अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जल कलश रथ मुंबईकडे रवाना होईल, असेही त्यांनी नमूद केले.

माझेही समर्थक लवकरच भाजपत...
आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी ‘भाजप’मध्ये प्रवेश केला आहे. परंतु, तुमचे समर्थक कधी प्रवेश करणार ? याबद्दल विचारले असता जगताप यांनी माझे समर्थक लवकरच पक्षप्रवेश करतील, असे नमूद केले. मात्र, किती नगरसेवक ? याचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.  

आठवडाभरात मुलाखतींचे वेळापत्रक तयार
पक्षाकडे एकूण ५५० इच्छुकांचे अर्ज आले आहेत. पालकमंत्री गिरीश बापट आठवडाभरासाठी पूर्ण जिल्ह्याचे वेळापत्रक निश्‍चित करत आहेत, असे जगताप यांनी नमूद केले. नोटाबंदीमुळे पडलेल्या छाप्यात ‘भाजप’चे नेते तुरळक प्रमाणात आहेत. इतर पक्षांचे नेतेही अडकले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

Web Title: Preparation of tender corruption