esakal | तिसऱ्या लाटेच्या प्रतिकाराची तयारी; बाणेरला उभारले पाच मजली कोविड सेंटर
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Center Baner

तिसऱ्या लाटेच्या प्रतिकाराची तयारी; बाणेरला उभारले पाच मजली कोविड सेंटर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या (Corona) संभाव्या तिसऱ्या लाटेचा (Third Wave) प्रतिकार करण्याची तयारी महापालिकेने (Municipal) सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बाणेर येथे पाच मजली कोविड सेंटर (Covid Center) तयार ठेवले आहे. त्यात ऑक्सिजन बेडसह ‘आयसीयू’ची देखील सोय आहे. गंभीर रुग्णाला घेऊन आलेली रुग्णवाहिका लिफ्टमधून थेट ‘आयसीयू’पर्यंत पोचणार आहे.

महापालिकेने बाणेर परिसरातील सर्वे क्रमांक ३३ मध्ये हे कोविड सेंटर उभारले आहे. त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून तयारी सुरू होती. तसेच बाणेर येथे सध्या एक कोविड रुग्णालय कार्यरत आहे. शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयाच्या शेडची मुदत संपत आल्याने त्याच्या वापरावर मर्यादा येऊ शकते. त्यातून आणखी एका कोविड रुग्णालयाची गरज भासू शकते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही तयारी केली आहे.

हेही वाचा: भारतात पर्सनल एआय असिस्टंट एसयूव्ही "ऍस्टर'

या इमारतीचे पहिले दोन मजले हे पार्किंगसाठी राखीव होते. त्यावर मोटारी पार्क करण्यासाठी खास लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. या दोन्ही मजल्यांचे आता आतिदक्षता विभागात (आयसीयू) रुपांतरीत करण्यात आले आहे. प्रत्येक मजल्यावर ३१ म्हणजेच एकूण ६२ आयसीयू बेड असणार आहेत. तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या मजल्यावर १४७ ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. या रुग्णालयासाठी पंचशील फाउंडेशन, ब्लॅकस्टोन प्रा. लि., टाटा सन्न प्रा. लि. क्रेडाई पुणे, पुणे सिटी कनेक्ट एनजीओ, नंदन असोसिएशन, मालपाणी ग्रुप, नार्डिको या संस्थांनी सीएसआर फंडातून वस्तू उपलब्ध करून दिल्याची माहिती कार्यकारी अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.

थेट जागेवर जाऊन एक्सरे

तळमजल्यावर प्रशासकीय विभाग, तपासणी व चाचणी विभाग, डॉक्टर रूम, कंट्रोल रूम उपलब्ध केल्या आहेत. या रुग्णालयासाठी फिरते एक्सरे मशिन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या छातीचा ‘एक्स रे’ काढण्यासाठी हे मशिन थेट बेड पर्यंत नेता येते. त्याचा रिपोर्ट त्वरित डॉक्टरांच्या मोबाईलवर, संगणकावर उपलब्ध होतो. तसेच दोन ऑक्सिजन जनरेशन प्लांटही उभारले असून, त्याची क्षमता प्रत्येकी १०५० लिटर प्रति मिनीट इतकी आहे. तर १३ हजार लिटरचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टॅक उभारण्यात आला आहे.

२०६९ - चौ.मी. कोविड सेंटरचे क्षेत्रफळ

६ - मजले

६२ - आयसीयू बेड संख्या

१४७ - ऑक्सिजन बेड संख्या

६० - डॉक्टर

१५० - नर्सची व इतर कर्मचारी

१२ कोटी - रुग्णालयासाठी आला खर्च

महापालिकेचा निधी व खासगी संस्थांची मदत यातून बाणेर येथे कोविड सेंटर उभारले आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाटेचा प्रतिकार करण्यासाठी हे रुग्णालय सज्ज आहे. यात आधुनिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध केल्या असून भविष्यात महापालिकेचे रुग्णालय म्हणून देखील याचा वापर होऊ शकतो.

- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

loading image
go to top