Ajit Pawar
Ajit PawarSakal

मुख्यमंत्रीही जनतेतूनच निवडा; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला तुम्ही राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करा, असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सरकारवर केला.
Summary

जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला तुम्ही राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करा, असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सरकारवर केला.

बारामती - जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला तुम्ही राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करा, असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सरकारवर केला. नगराध्यक्ष व सरपंचपद जनतेतून निवडण्याच्या भूमिकेबाबत विचारले असता बारामतीत ते माध्यमांशी बोलत होते. या प्रश्नाबाबत दोघांच्या मंत्रीमंडळाला खूप घाई झालेली दिसते अशी टीकाही त्यांनी केली.

पवार म्हणाले, लोकशाही मध्ये काही परंपरा असतात, 1967 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली, त्यांनी ही धोरणे ठरवली, तेही दूरदृष्टीचेच नेते होते, बहुमत ज्या पक्षाला असते त्यांचे खासदार पंतप्रधान ठरवतात, राज्यातही 145 आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री होतात त्याच पध्दतीने याही निवडी होत होत्या, तशाच पध्दतीने नगराध्यक्ष व सरपंचपद निवडले गेले असते तर बरे झाले असते. सरपंच व नगराध्यक्ष इतर विचारांचे असतील तर काय होते याचा अनुभव या पूर्वी घेतला आहे. अधिकाराचे केंद्रीकरण ही बाब लोकशाही घातक आहे. ज्यांच्याकडे मसल व मनी पॉवर आहे असेच लोक निवडणूक जिंकू शकतात.

विधीमंडळात हा मुद्दा मांडून चर्चा करुन ज्या सूचना येतील त्यांचा विचार करुन मगच हा निर्णय घ्यायला हवा होता. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. आमदारांचे मत यात विचारातच घेतले गेले नाही.

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतक-यांना मतदानाचा अधिकार दिला या बाबत आपले दुमत नाही, पण निवडणूकीचा मोठा खर्च बाजार समितीला करावा लागणार आहे. राज्यातील अनेक बाजार समित्या एवढा खर्च पेलू शकणार नाहीत, त्यांना खर्चच झेपणार नसेल तर मग शासन निवडणूका थांबवणार का, असा सवाल अजित पवार यांनी केला.

नवीन सरकार नव्याने आल्यानंतर पूर्वीच्या काही निर्णयांचा फेरविचार होतो, राज्याच्या हिताचे जे निर्णय असतात ते नवीन सरकारही कायमच करतात, नामांतराबाबत स्वताः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री चर्चा करणार आहेत, त्या मुळे जो वर निर्णय होत नाही तो वर यावर मत देणे योग्य ठरणार नाही असे अजित पवार म्हणाले.

नवीन सरकारने बहुमतावर सर्व गोष्टी केल्या मग मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही, पूरपरिस्थिती असताना तातडीने पालकमंत्री नेमून त्यांच्यावर तेथील जबाबदारी द्यायला हवी, पालकमंत्र्यांनीही सरकारी यंत्रणेला विश्वासात घेत उपाययोजना करणे गरजेचे आहे. माझेही मुख्यमंत्र्यांना जनतेच्या वतीने आवाहन आहे, मंत्रीमंडळाचा विस्तार करावा. महापूराचा त्रास होत आहे, दुबार पेरणी करावी लागणार आहे, भातशेतीचे नुकसान झाले आहे, बियाणे नव्याने द्यावे लागेल, जमिनीचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करावे लागणार आहे, घरांच्या नुकसानीचा अंदाज घ्यावा लागणार आहे, पूरग्रस्तांना एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात द्यायला हवा, असे माझे स्पष्ट मत असल्याचेही अजित पवार म्हणाले.

शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र लढणार का यावर या बाबतचा अंतिम निर्णय शरद पवार व उध्दव ठाकरे हे घेतील, ते दोघे जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही करु.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com