महापालिकेत युतीत नाराजीनाट्य

महापालिकेत युतीत नाराजीनाट्य

पुणे - लोकसभा निवडणुकीत एकत्रित येत विरोधकांवर तोफ डागणाऱ्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला आता तडे जाण्यास सुरवात झाली आहे. महापालिकेतील चारपैकी एका विषय समितीचे अध्यक्षपद घेण्याचा भाजपचा प्रस्ताव शिवसेनेने धुडाकावून लावत, सत्तेत वाटा देताना भाजप आखडता हात घेत आहे, असा ठपका ठेवला; तर शिवसेनेने प्रतिसाद न दिल्याने भाजपने चारही समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. लोकसभा निवडणूक संपून दोनच दिवस झाले असताना युतीत सुंदोपसुंदी सुरू झाल्याने राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगली आहे. 

विधी आणि क्रीडा समितीचे अध्यक्षपद देण्याबाबत शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करून तसा प्रस्ताव भाजपने ठेवला होता, मात्र तो मान्य केला नसल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले; तर युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजप नेत्यांशी चर्चा केली; पण ते केवळ बोळवण करीत असल्याने प्रस्ताव आम्हाला पटला नाही, असे शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी सांगितले. 

महापालिकेतील शहर सुधारणा समितीसह, महिला व बालकल्याण, क्रीडा आणि विधी समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून युतीतील मनभेद उघड झाले आहेत. या दोन्ही पदांसाठी मंगळवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. या चारपैकी महत्त्वाच्या शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद मिळण्याची आशा शिवसेनेला होती. प्रत्यक्षात मात्र, शिवसेनेकडून मागणी होण्याआधीच क्रीडा किंवा विधी समिती घेण्याचा प्रस्ताव भाजपने मांडला. त्यावरून नाराज झालेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजप नेत्यांना प्रतिसाद दिला नाही. त्याचे कारण पुढे करीत, चारही समित्यांसाठी आपल्या नगरसेवकांची नावे जाहीर करून भाजप नेते मोकळे झाले. दुसरीकडे मात्र, स्थायी समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसने उमेदवार दिला नसल्याचे सांगत भाजपने दोन्ही पक्षाला समित्यांमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.  

दरम्यान, शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपने अमोल बालवडकर, महिला व बालकल्याण समिती ज्योत्स्ना एकबोटे, विधी समिती योगेश समेळ, क्रीडा समितीसाठी विजय शेवाळे यांना संधी दिली, तर दोन्ही काँग्रेसनेही आपले उमेदवार दिले आहेत.

भाजपच्या नगरसेवकांच्या सोयीसाठी योग्य प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली नाही. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणे झाले आहे.
- संजय भोसले, गटनेते, शिवसेना

युतीमुळे शिवसेनेलाही सत्तेत स्थान देणार आहोत. त्यामुळे समित्यांचा प्रस्ताव दिला होता; परंतु त्यांच्याकडून विचार झालेला नाही. प्रभाग समित्यांबाबत त्यांच्याशी चर्चा होईल.
- मुक्ता टिळक, महापौर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com