राष्ट्रपतींच्या शिष्टाचाराला पालिकेकडून हरताळ

उमेश शेळके
शुक्रवार, 15 जून 2018

पुणे - कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आगमन...ऐन वेळी डायसवर खुर्ची टाकून उपमहापौरांना दिलेले स्थान...कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख नसतानाही उपमहापौरांनी मानलेले आभार आणि कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींबरोबर काढलेले छायाचित्र हा प्रकार म्हणजे राष्ट्रपती कार्यालयाच्या दृष्टीने महापालिकेने केलेला शिष्टाचाराचा भंगच आहे. त्याचा लेखी जाब राष्ट्रपती कार्यालयाने महापालिकेकडून मागविला आहे. त्यामुळे महापालिका अडचणीत आली आहे.

वाडिया कॉलेजसमोरील रमाबाई आंबेडकर उद्यानातील पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमावरून महापालिका अडचणीत आली आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शिष्टाचार पाळला गेला नसल्याप्रकरणी थेट राष्ट्रपती कार्यालयाकडून याबाबत विचारणा झाली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.

महापालिकेने या उद्यानात रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच झाले. या कार्यक्रमाची रूपरेषा अगोदरच ठरली होती. प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या ठिकाणी ऐन वेळी अनेक गोष्टी बदलण्यात आल्या. राष्ट्रपतींच्या आगमनानंतर खासदार रामदास आठवले आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आगमन झाले. डायसवर उपमहापौरांसाठी अचानक बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

कार्यक्रम संपल्यानंतर आभार मानणे, त्यानंतर राष्ट्रपतींबरोबर छायाचित्र काढणे आदी गोष्टी या कार्यालयाच्या दृष्टीने शिष्टाचार भंग करणाऱ्या ठरल्या आहेत.

राष्ट्रपती पद हे देशातील सर्वोच्च पद आहे. या पदासाठीचा शिष्टाचारही मोठा आहे. एखाद्या कार्यक्रमाला राष्ट्रपती जाणार असतील, तर त्याची रूपरेषा अगोदर ठरते. तसेच डायसवर कोणी बसायचे येथपासून मिनीट टू मिनीट कार्यक्रम निश्‍चित केलेला असतो. त्यानुसारच कार्यक्रम होतो. ऐन वेळी कोणताही बदल त्यामध्ये करता येत नाही; परंतु महापालिकेकडून या कार्यक्रमात अनेक त्रुटी राहिल्याचे राष्ट्रपती कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून राज्य सरकारच्या सर्वसामान्य विभागाला याबाबत विचारणा झाली. त्यावरून राज्य सरकारने मुख्य शिष्टाचार अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना महापालिकेकडून याबाबत खुलासा मागविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेला आता त्यावर खुलासा करण्याची वेळ आली असून, त्या खुलाशाने राष्ट्रपती कार्यालयाचे समाधान झाले नाही, तर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

साधू वासवानी मिशनही अडचणीत
या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी साधू वासवानी मिशन कार्यालयास भेट दिली. त्या भेटीमध्ये ऐन वेळी त्यांना ग्रीन रूममध्ये नेणे, शूज काढावयास लावणे यामुळेदेखील शिष्टाचाराचा भंग झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही खुलासा मागविण्यात आला आहे.

Web Title: president ramnath kovind municipal