Vidhan Sabha 2019 : पिंपरीत इच्छुकांचे दबावतंत्र?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पिंपरी विधानसभेसाठी तीन दिवसांत ७४ जणांनी तब्बल १७५ अर्ज नेले आहेत. त्यापैकी रिंगणात प्रत्यक्ष किती जण उतरणार हे औत्सुक्‍याचे आहे. मात्र, प्रतिस्पर्धींकडून केवळ दबावतंत्र निर्माण करण्याचा हा प्रकार आहे का, असा मुद्दा सध्या मतदारसंघात उपस्थित केला जात आहे.

विधानसभा 2019  
पिंपरी - पिंपरी विधानसभेसाठी तीन दिवसांत ७४ जणांनी तब्बल १७५ अर्ज नेले आहेत. त्यापैकी रिंगणात प्रत्यक्ष किती जण उतरणार हे औत्सुक्‍याचे आहे. मात्र, प्रतिस्पर्धींकडून केवळ दबावतंत्र निर्माण करण्याचा हा प्रकार आहे का, असा मुद्दा सध्या मतदारसंघात उपस्थित केला जात आहे.

पिंपरी मतदारसंघ आरक्षित असून, येथून अनेक जण इच्छुक आहेत.  शिवसेनेला पिंपरीची जागा मिळाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत पिंपरीसह चिंचवड, भोसरी या जागा राष्ट्रवादीला मिळाल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यातच मेळाव्यात जाहीर केले. तरीही तीन दिवसांत काँग्रेसकडून सहा जणांनी अर्ज नेले आहेत. अशीच स्थिती भाजपबाबत आहे. युतीमध्ये पिंपरी मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्याचे निश्‍चित झालेले असतानाही मंगळवारी (ता. १) भाजपच्या दोघांनी अर्ज नेले. तर, मागील तीन दिवसांत भाजपच्या एकूण पाच जणांनी अर्ज नेले आहेत.

अपक्षांची संख्या अधिक
पिंपरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये अपक्षांची संख्याही अधिक आहे. मागील तीन दिवसांत २३ अपक्षांनी ३९ अर्ज नेले आहेत. त्यातील प्रत्यक्षात किती जण निवडणूक रिंगणात उतरणार, हे चित्र अर्ज माघारीच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (ता. ७) स्पष्ट होणार आहे.

क्षेत्राबाहेरीलही इच्छुक
अर्ज नेलेल्यांमध्ये पिंपरी विधानसभा क्षेत्राबाहेर वास्तव्यास असलेल्या दहा जणांचा समावेश आहे.

आजी-माजींनी नेले अर्ज
पिंपरी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १) २२ जणांनी ५४ अर्ज नेले. त्यात विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार, माजी आमदार अण्णा बनसोडे यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pressure of interested candidate in Pimpri