पूर्वमोसमी पावसाची दमदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) 30 मे रोजी दक्षिण कर्नाटकमध्ये पोचले. त्यानंतर अद्यापही त्याच भागात मुक्काम ठोकला आहे. त्याचवेळी ईशान्य भारतातील मॉन्सूनने मिझोराम आणि नागालॅंड या राज्यांत शुक्रवारी धडक दिली.

पुणे : पूर्वमोसमी पावसाने राज्याच्या बहुतांश भागांत शनिवारी दमदार हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवसांमध्ये जोर वाढण्याची शक्‍यता असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

सकाळी उन्हाचा चटका, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी वळवाचा पाऊस असे वातावरण महाराष्ट्र सध्या अनुभवत आहे. महाबळेश्‍वर, कोल्हापूरसह जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, मंगळूरपीर या भागांतही दुपारनंतर पूर्वमोसमीच्या सरी पडल्या. 

का बरसतोय पूर्वमोसमी पाऊस? 

राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान वाढलेले आहे. त्याच वेळी अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून बाष्प महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगांची दाटी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. 

अतिवृष्टीचा इशारा 

राज्यात येत्या सोमवारपर्यंत (ता. 4) तुरळक ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात मंगळवारपासून (ता. 5) जोर वाढणार असून, बुधवारी (ता. 6) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्‍यता आहे. 

मॉन्सूनचा मुक्काम कर्नाटकातच 

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) 30 मे रोजी दक्षिण कर्नाटकमध्ये पोचले. त्यानंतर अद्यापही त्याच भागात मुक्काम ठोकला आहे. त्याचवेळी ईशान्य भारतातील मॉन्सूनने मिझोराम आणि नागालॅंड या राज्यांत शुक्रवारी धडक दिली. येत्या रविवारपर्यंत ईशान्येकडील आणखी काही राज्यांत मॉन्सूनची प्रगती शक्‍य आहे.

मंगळवारपर्यंत विषुववृत्ताकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह तीव्र होऊन, कर्नाटकमध्ये मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सून येत्या बुधवार (ता. 6) ते शुक्रवार (ता. 8) दरम्यान महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

या ठिकाणी बरसला पाऊस (संध्याकाळी साडेपाचपर्यंतची नोंद. सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) 
पुणे ....... 5 
लोहगाव.... 1 
महाबळेश्‍वर ... 57 
नाशिक .... 8 
अकोला .... 2 
वाशीम .... 10 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pretty heavy rain showers