सावधान, भारतात स्तनाच्या कर्करोगाचे वाढतेय प्रमाण!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

- 'ग्लोबोकॅन'च्या अहवालातील निष्कर्ष

'मॅमोग्राफी'द्वारे निदान शक्‍य

पुणे : भारतात दिवसेंदिवस स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. पूर्वी एक लाख महिलांमागे 15 रुग्ण आढळत असत. आता हेच प्रमाण प्रति एक लाखामागे 35 इतके वाढले आहे. शिवाय स्तन कर्करोगामुळे होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे.

सन 2018 मध्ये ग्लोबोकॅन या संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही बाब उघड झाली आहे. या कर्करोगाबाबत जागरुकतेचा अभाव, अगदी शेवटच्या टप्प्यात निदान होणे, उपचारासाठीच्या अपुऱ्या सुविधा, तरुण महिलांमध्ये याचे वाढते प्रमाण आदी बाबींमुळे स्तन कर्करोग हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे यावर मात
करण्यासाठी बहुआयामी व व्यापक प्रयत्न गरजेचे असल्याचे मत प्रख्यात कर्करोग तज्ज्ञ आणि सह्याद्री हॉस्पिटलमधील कर्करोग विभागाच्या संचालिका डॉ. शोना नाग यांनी व्यक्त केले.

या बहुआयामी प्रयत्नांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी अधिक जागरूकता, निदान व उपचाराच्या सुविधांमध्ये विस्तार व सुधार, ब्रेस्ट फीडिंगबाबत जागरूकता आणि व्यापक स्तरावर तपासणी शिबिरे आदींचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

डॉ. नाग म्हणाल्या, 'ग्लोबोकॅन'च्या अहवालानुसार सन 2018 मध्ये भारतात एक लाख 62 हजार नव्या महिला रुग्णांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यामुळे स्तनाचा कर्करोग हा भारतात सर्वांत सामान्यपणे आढळणारा कर्करोग आहे. नव्याने निदान झालेल्या कर्करोगांपैकी याचे प्रमाण 14 टक्के आहे. 2018 मध्ये स्तनाच्या कर्करोगावर तब्बल 87 हजार रुग्ण मृत्युमुखी पडले. ही धक्कादायक बाब आहे. याचा अर्थ याचवर्षात स्तनाचा कर्करोगाचे निदान झालेल्या महिलांपैकी 50 टक्के मृत्यूमुखी पडल्या. पुण्यात 2018 मध्ये सुमारे 9000 व्यक्तींना कर्करोगाचे निदान झाले. त्यापैकी 1400 रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे असल्याचे आढळून आले आहे.

'मॅमोग्राफी'द्वारे निदान शक्‍य

यावर उपाययोजना करण्यासाठी वेळेत निदान होणे आवश्‍यक आहे. कारण पहिल्या टप्प्यात या रोगाचे निदान झाल्यास, मृत्यूचे प्रमाण30 टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते. यासाठी 45 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांनी मॅमोग्राफी ही चाचणी करणे आवश्‍यक आहे. यामुळे या रोगाचा संभाव्य धोका टाळण्यास मदत होते, असेही डॉ. शोना नाग यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the prevalence of breast cancer in India is increasing