दिवाळीत खासगी ट्रॅव्हलवर 'वॉच'; प्रवाशांची लूट रोखण्यासाठी दक्षता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

पुणे : दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने व अडवणूक करून कित्येक पट तिकीट दर आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. साध्या वेशातील पोलिसांकडून लक्ष ठेवले जाणार आहे. 

पुणे : दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने व अडवणूक करून कित्येक पट तिकीट दर आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. साध्या वेशातील पोलिसांकडून लक्ष ठेवले जाणार आहे. 

दिवाळीनिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. अनेक जण खासगी ट्रॅव्हल्सद्वारे प्रवास करतात. मात्र, कंपन्या मनमानी तिकीट दर आकारून त्यांना लुबाडतात. या पार्श्‍वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याची वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या उपस्थितीत 19 ऑक्‍टोबरला बैठक घेण्यात आली. या वेळी कंपनीचे चालक, मालक, व्यवस्थापक, बुकिंग एजंट उपस्थित होते. 

या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार, राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांचे कमाल भाडे निश्‍चित केले. त्यानुसार, खासगी प्रवासी वाहतूकदारांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या (एसटी) टप्पा वाहतुकीच्या प्रतिकिलोमीटर भाडे दराच्या दीडपट अधिक राहणार नाही, असे निश्‍चित केले. नियमाची अंमलबजावणीचे आदेश देशमुख यांनी दिले. तसेच प्रवाशांकडून जादा भाडे आकारल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. चालक, वाहक, एजंटांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे, मद्यपान करून वाहने चालवू नयेत, बस थांबविल्यानंतर रिक्षाचालक प्रवाशास त्याच्या इच्छेविरुद्ध प्रवास करण्यास भाग पाडणार नाहीत, अशी सूचना दिल्या आहेत. 

या सुविधा पुरवा 

पिण्याचे पाणी 
प्रसाधनगृह 
सीसीटीव्ही 
खासगी सुरक्षारक्षक 
वाहतूक नियमनासाठी वॉर्डन 

इथे करा तक्रार 
खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचण आणली तर प्रवाशांनी वाहतूक शाखेतील व्हॉटसऍप क्रमांक 8411800100 यावर किंवा वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष 020 - 26685000 या क्रमांकावर किंवा @punecitytraffic या ट्‌विटरवर तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. 

दिवाळीनिमित्त प्रवाशांची खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून लुबाडणूक होते. हा प्रकार थांबविण्यासाठी वाहतूक शाखेने प्रयत्न केले आहेत. प्रवासी आमच्याकडे तक्रार करू शकतात, तसेच साध्या वेशातील पोलिस खासगी ट्रॅव्हल्सच्या ठिकाणी थांबून गैरप्रकारावर लक्ष ठेवणार आहेत. 
- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to prevent the plunder of travelers pune Traffic police keep Watch on Private Travel bus in Diwali