मागणी कमी झाल्याने डाळिंबाचे भाव घसरले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

पुणे - चांगले उत्पादन आणि कमी झालेल्या मागणीमुळे डाळिंबाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे चांगल्या मालास भाव मिळत नसल्याने व्यापारी आणि शेतकरीही चिंतेत आहेत. 

पुणे - चांगले उत्पादन आणि कमी झालेल्या मागणीमुळे डाळिंबाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे चांगल्या मालास भाव मिळत नसल्याने व्यापारी आणि शेतकरीही चिंतेत आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, माढा, मोहोळ या भागातून, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्‍यातून, तसेच सातारा, नगर जिल्ह्यातून डाळिंबाची आठ ते दहा हजार क्रेट्‌सइतकी आवक सध्या होत आहे. साधारणपणे जून-जुलै महिन्यात डाळिंबाचे भाव कमी होत असतात, असा साधारण अनुभव आहे. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येणाऱ्या मालास चांगला भाव मिळू लागतो. यंदा पावसाने साथ दिल्याने डाळिंबाचे उत्पादन चांगले होत आहे. मालाची प्रतही चांगली आहे; परंतु त्याला अपेक्षित भाव सध्या मिळत नाही. गेल्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून मागणी घटत जाऊन भावांत घसरण झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील हा निचांकी भाव आहे. 

याबाबत डाळिंब विक्रेते तानाजी चौधरी म्हणाले, ""गेल्या वर्षी दुष्काळामुळे एप्रिलच्या कालावधीत आवक कमी होती. आवकेमधील जवळ जवळ 70 टक्के माल हा कमी प्रतीचा होता. त्यामुळे चांगल्या प्रतिच्या मालाला भाव मिळाला. यंदा 90 टक्के माल हा चांगल्या प्रतिचा येत आहे. केवळ दहा टक्के माल खराब आहे. चांगल्या प्रतिच्या मालाची आवक जास्त होत असल्याचा बाजारावर परिणाम झाला आहे. त्यातच उन्हाळ्यात कलिंगड, खरबूज या पाणीदार फळांना मागणीही वाढली आहे. आंब्याचा हंगामही सुरू झालेला आहे, त्याचेही भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहिले आहेत. या फळांच्या उलाढालीचा परिणाम डाळिंबाच्या उलाढालीवर झाला आहे. केवळ स्थानिक बाजारातूनच नव्हे, तर परराज्यातील बाजारातूनही डाळिंबाची मागणी कमी झाली आहे.'' 

डाळिंबाचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे ( रुपयांत ) 
आरक्ता : 10 - 40 
गणेश : 5 - 25 
भगवा : 10 - 70 

Web Title: Prices fell due to reduced demand for pomegranates