पुणे : दुधाच्या दरात पुन्हा वाढ; नवे दर...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

- महिनाभरात दुसऱ्यांदा वाढ

- शनिवारी मध्यरात्रीपासून अंमलबजावणी

पुणे : दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर आणखी दोन रुपयांची वाढ
करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत शुक्रवारी (ता.10) घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शनिवारी (ता.11) मध्यरात्री बारा वाजल्यापासून केली जाणार आहे. परिणामी दूध लिटरमागे दोन रुपयांनी महागणार
आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा ही दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांना आता गाईचे दूध किमान 48 रुपये तर, म्हैस दूध 58 रुपये रुपये लिटरने खरेदी करावे लागणार आहे. राज्यातील खासगी व सहकारी दूध उत्पादक संघांनी मिळून राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ स्थापन केला आहे. या संघाची शुक्रवारी (ता.10) पुण्यात बैठक झाली. या बैठकीला राज्यभरातील 73 दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला
असल्याचे या कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के आणि सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.

स्मृती इराणींचे दीपिका पदुकोनला थेट आव्हान 

देशभरात दूध उत्पादनात सुमारे 10 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. शिवाय दूध पावडर आणि लोण्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे दूध संघांना पुरवठा होणाऱ्या दुधाच्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी, अन्य राज्यातील दूध संस्था महाराष्ट्रातील दूध पळवू लागले आहेत. तसेच शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यात प्रतिलिटर सहा रुपयांनी दर वाढवून देण्यात आलेला आहे. या
बाबींमुळे विक्री दरात वाढ करणे अपरिहार्य ठरले.

Image result for milk

दरम्यान, दूधाच्या विक्री दरात वाढ केल्याने, दर्जेदार दुधाचीच विक्री करण्याचे बंधन सर्व संघांवर घालण्यात आले आहे. त्यानुसार कल्याणकारी दूध संघ यापुढे दरमहा सर्व
दूध संस्थांच्या दुधाचा दर्जा तपासणार आहे. याबाबतचा तपासणी अहवालही प्रसिद्ध केला जाणार आहे. यामुळे निकृष्ट दूध पुरवठ्याचा आळा बसू शकेल, असेही कुतवळ यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव

राज्यातील नवनियुक्त महाविकास आघाडीचे सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींकडून दूध व्यवसायासाठी सकारात्मक पावले उचलली जाऊ लागली आहेत. यामुळे दूध संघांच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व
मंत्र्यांचे अभिनंदन करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prices of Milk have been Increased by 2 Rupees