बारामतीत प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

ज्ञानेश्वर रायते
मंगळवार, 17 एप्रिल 2018

बारामती - बळिराजाच्या पाठीवर थाप टाकणारा कार्यक्रम शारदानगरच्या अप्पासाहेब पवार सभागृहात आज होताना प्रयोगशील शेतकऱ्यांच्या कहाण्या ऐकताना राज्यभरातील शेतकऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. 

बारामती - बळिराजाच्या पाठीवर थाप टाकणारा कार्यक्रम शारदानगरच्या अप्पासाहेब पवार सभागृहात आज होताना प्रयोगशील शेतकऱ्यांच्या कहाण्या ऐकताना राज्यभरातील शेतकऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. 

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते चार शेतकऱ्यांचा ७५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या पद्मश्री अप्पासाहेब पवार प्रयोगशील शेतकरी पुरस्कारासाठी मराठवाडा शेती मंडळाचे विश्वस्त विजय बोराडे, अकोला विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, डॉ. नारायण हेगडे, माजी अध्यक्ष द्राक्ष बागायतदार संघ अशोक गायकवाड, डॉ. एस. एन. जाधव, डॉ. सुदाम अडसूळ यांची निवड समिती होती. त्यांनी जे शेतकरी हेरले, त्यांची कहाणी..

बाईपणाची झूल झुगारून ओढला सहा एकरांचा गाडा  
उमा क्षीरसागर ही जालना जिल्ह्यातील युवती शेतकरी ! उमा ही कुटुंबातील सातवी मुलगी. सहा बहिणींची लग्ने झाल्यानंतर वडिलांना एकदा हृदयविकाराचा झटका आला आणि उमाला आठवीतून शाळा सोडावी लागली. वयाच्या १३ व्या वर्षी तिने घराची धुरा खांद्यावर घेतली. घरच्या सहा एकर जमिनीत द्राक्षाची लागवड केली. स्वतःच सगळी यंत्रे, औजारे चालवली.

वर्षाकाठचे ५० हजारांचे उत्पन्न तिने ४ लाखांवर नेले. ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने औषधांची फवारणी करताना ती करीत असलेला औषधांचा अचूक वापर आसपासच्या शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय असतो. तिने द्राक्षापुरते मर्यादीत न राहता इतर पिकांवर काकडी, कलींगड, खरबूज पिके घेतली. उमा सातत्याने नवनवे प्रयोग शेतीत करते. ती आज म्हणाली, ‘मी ही शेती सांभाळून नेली पाहिजे अशी वडिलांची इच्छा होती. मग मीही बाईपणाची झूल झुगारून सहा एकरांचा गाडा स्वतः ओढला. आईवडिलांचा सांभाळ करून वर्षाकाठी ३ ते ४ लाखांचे उत्पन्न मिळवतेय याचे समाधान आहे.‘ 

उजाड माळरानावर फुलवली शेती
सोलापूर जिल्ह्यातील रमेश कचरे यांची कहाणी. मोहोळ तालुक्‍यातील तेलंगवाडी येथील रमेश कचरे यांचे कुटुंब अचानक सन २००० मध्ये विभक्त झाले आणि आठ एकर शेती जवळ असूनही एकही रुपया नसल्याने आता पुढे काय, असा प्रश्न समोर आला. एकवेळ खाण्याचीही पंचाईत असलेल्या रमेश यांनी प्रसंगी गावातील जनावरे सांभाळली. मित्राकडून उसने पैसे घेऊन आठ एकरांत टोमॅटो लावले. योगायोगाने भाव चांगला मिळाला, आठ एकरांतून ३० लाखांचे उत्पन्न मिळाले. डोक्‍यावरचे कर्ज फिटले. नवी उमेद जागी झाली. आलेल्या पैशातून खंडाळी येथे १५० एकर पडीक जमीन खरेदी केली. १५० एकरांवर डाळिंब लावले. आंतरपिके घेतली. एकवेळच्या उजाड माळरानावर खूप पैसे मिळाले. सर्व शेती ऑटोमायझेशन केली. शेती अशी करायची की, एकाचवेळी ८०-८० एकरांवर कारले लावायचे, मिरची लावायचे प्रयोग झाले.

या धाडसी प्रयोगाला पैसेही चांगले मिळाले. मात्र अचानक दुष्काळ पडला. टॅंकरने पाणी आणून बाग जगवावी लागली. त्यातच तेल्या रोगाने १५० एकर बाग उद्‌ध्वस्त झाली. शेती विकायला काढली. पेपरमध्येही जाहिरात दिली. पण पुन्हा उमेद जागवून संत्र्याची बाग केली, तीही फुलली. मग मात्र वळून मागे पाहिले नाही. मग आयात निर्यातीच्या दोन कंपन्या सुरू केल्या. दोन कंपन्या असल्या तरी शेती हेच दैवत असल्याचे कचरे मानतात.

Web Title: Pride of Experimental Farmers in Baramati