प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे हाल; आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून सेविका गायब

Doctor
Doctor

नसरापूर - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णालयास कुलूप असल्याने नाहक त्रास सहन करत खासगी रुग्णवाहिका करून भोर रुग्णालयात जावे लागले. या वेळी कामावर असताना आरोग्य केंद्राला कुलूप लावून घरी निघून गेलेल्या आरोग्य सेविकेला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा मागितला असून, निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये? अशी नोटीस बजावली आहे.

माळेगाव (ता. भोर) येथील कविता काशिनाथ खडाखडे या महिलेस रात्रीच्या वेळी प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना नसरापूर प्राथमिक केंद्रात आणले. मात्र, आरोग्य केंद्रास कुलूप लावलेले होते. त्या वेळी कामावर असलेल्या आरोग्य सेविका विद्या हेम्बाडे या कुलूप लावून घरी निघून गेल्या होत्या. नातेवाइकांनी त्यांना फोन करून बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यास त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना खासगी रुग्णवाहिकेद्वारे भोर ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. आरोग्य केंद्रास चक्क कुलूप ठोकून घरी निघून गेलेल्या आरोग्य सेविकेबद्दल नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती लहुनाना शेलार यांनी केली आहे.

याबाबत रुग्ण महिलेचे भाऊ दौलत कोळी यांनी सांगितले की, त्या दिवशी दुपारीच आम्ही माझ्या गर्भवती बहिणीस नसरापूर आरोग्य केंद्रात आणले होते. त्या वेळी सोनोग्राफीसाठी भोरला पाठविण्यात आले. भोर येथे उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी केल्यावर आम्हाला प्रसूतीसाठी अजून दोन दिवस वेळ असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही घरी परतलो. मात्र, रात्रीच्या नऊ वाजण्याच्या सुमारास बहिणीस प्रसूतिवेदना होऊ लागल्याने आम्ही तातडीने नसरापूर आरोग्य केंद्रात नेले. तिथे आरोग्य केंद्रास कुलूप होते व आमची दखल घेतली नाही. शेवटी खासगी रुग्णवाहिकेने भोर उपजिल्हा रुग्णालयात जावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com