स्टेथोस्कोप मोडलेले; औषधांसाठी रुग्ण बाहेर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

शिक्रापूर - अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी ठेवणारे थम्ब मशिन बंद, रक्तदाब मोजणारे मशिन आणि स्टेथोस्कोप मोडलेले, रुग्णांच्या सेवेसाठी असलेली गाडी बारामतीच्या आरोग्य शिबिरासाठी गेलेली, औषधांसाठी रुग्णांना बाहेर पाठविलेले...अशी परिस्थिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी केंदूर (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाहणीवेळी अनुभवली. 

केंदूर येथे रविवारी एका महिलेचे बाळंतपण डॉक्‍टर नसल्याने आरोग्यसेविकांनी केले आणि त्यात बाळाचा मृत्यू झाला. हे वृत्त सोमवारी (ता. १३) प्रसिद्ध होताच डॉ. माने यांनी येथे भेट दिली. ग्रामस्थांनी त्यांना दवाखान्याची दुरवस्था दाखविली. यात थम्ब मशिन सहा महिन्यांपासून बंद असल्याचे दाखविले; तर स्टेथोस्कोप आणि रक्तदाब मोजण्याचे मशिनही मोडलेले आढळले. अत्यवस्थ रुग्ण वाहण्याची गाडी नसल्याने झालेली रुग्णांची हेळसांड आणि रुग्णांना थेट बाहेरील दुकानातून औषधे आणायला पाठविले जात असल्याचे डॉ. माने यांना अनुभवायला आले.

याबाबत डॉ. माने यांनी सांगितले, ‘‘येथील परिस्थितीला निवासी असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माया पवार यांची नकारात्मक मानसिकता एवढेच त्याचे उत्तर आहे. त्यांच्यावर अशाच कार्यपद्धतीच्या खेड तालुक्‍यातूनही चौकशा चालू आहेत. केंदूरच्या प्रकरणासह एकूणच सर्व चौकशी फाइल आपण लवकरच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देत आहे. योग्य ती दखल घेतली जाईल.’’  

थम्ब मशिन बंद पाडली?
केंदूर आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याची बाब उघडकीस आल्यावर थम्ब मशिन सहा महिने बंद कसे राहू शकते, हाच प्रश्‍न आहे. त्यामुळे मशिन बंद पडली की पाडली आणि ही मशिन बंद असताना त्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन काय झोपा काढीत होते काय? असा प्रश्‍न आता ग्रामस्थ विचारत आहेत.

Web Title: Primary Health Center Stethoscope medicine patient