प्राथमिक आरोग्य केंद्रे एका क्‍लिकवर

doctor
doctor

पुणे - जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामकाज ऑनलाइन करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना एका क्‍लिकवर घरबसल्या आरोग्य केंद्रातील सेवा, योजना आणि विविध प्रकारच्या लसीकरणाची माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. एवढेच काय, आता खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटीची वेळही ऑनलाइनच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. यासाठी ग्रामस्थ आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहेत.  

येत्या दोन आठवड्यांत हे ॲप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले जाणार आहे. सध्या भोर तालुक्‍यातील भोंगवली या एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रायोगिक तत्त्वांवर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. त्यातील त्रुटी शोधून त्या दुरुस्त केल्या जाणार आहेत.

दुरुस्त्यानंतरच अन्य सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी हे ॲप कार्यान्वित केले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने उपस्थित होते. 

ग्रामस्थांसाठी तयार केलेले ॲप मोबाईलवर प्लेस्टोरच्या माध्यमातून डाउनलोड करता येणार आहे. या ॲपमध्ये मराठी किंवा इंग्रजी, अशा दोन भाषांचा पर्याय देण्यात आलेला आहे. याच ॲपच्या माध्यमातून संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ॲपमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, त्या केंद्रांच्या अखत्यारितील उपकेंद्र, गावांची नावे, जिल्हा परिषद अध्यक्ष, आरोग्य समितीचे सभापती, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त आरोग्य अधिकारी आणि रुग्ण कल्याण समितीचे पदाधिकारी आदींची यादी आणि त्यांचे संपर्क क्रमांक, आरोग्यविषयक सर्व योजना, त्यासाठीची पात्रता, आवश्‍यक कागदपत्रे, बालकांच्या लसीकरणाची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

राज्यातील एकमेव जिल्हा - माने 
या ॲपमुळे ग्रामस्थांना आरोग्यविषयक सुविधा जलद गतीने मिळणार आहेत. शिवाय या सेवांमध्ये पारदर्शकताही येणार आहे. अशा पद्धतीने प्राथमिक आरोग्य केंद्रे ही डिजिटल करणारा पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपमध्ये संबंधित केंद्रातील महिनानिहाय बाह्यरुग्ण, आंतररुग्णांची आकडेवारी, शस्त्रक्रियांची माहिती, निदान झालेल्या आजारांची श्रेणीनिहाय माहिती, आरोग्यविषयक सरकारी योजना आणि तपासणी केलेल्या रुग्णांचे तपासणी अहवाल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 
- डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com