पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी - प्रणिती शिंदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पुणे - ""नोटाबंदीच्या पन्नास दिवसांनंतरही नागरिकांना पैशांसाठी बॅंका आणि एटीएमच्या मोठ-मोठ्या रांगांमध्ये उभे राहावे लागत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची जाहीर माफी मागावी,'' अशी मागणी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी येथे केली. 

पुणे - ""नोटाबंदीच्या पन्नास दिवसांनंतरही नागरिकांना पैशांसाठी बॅंका आणि एटीएमच्या मोठ-मोठ्या रांगांमध्ये उभे राहावे लागत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची जाहीर माफी मागावी,'' अशी मागणी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी येथे केली. 

शिंदे यांनी पुण्यात कॉंग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी कॉंग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी आमदार दीप्ती चवधरी आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाल्या, ""देशभरातील बॅंका आणि एटीएमच्या रांगेत उभे राहिलेल्या 115 नागरिकांच्या मृत्यूस पंतप्रधान कारणीभूत ठरले आहेत. त्यांनी जनतेची माफी मागावी. नोटाबंदीमुळे जनता "कॅशलेस' झाली; पण यंत्रणा कॅशलेस झाली नाही. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय फसला आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आगामी काळात या आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार आहे.'' 

""या निर्णयामुळे बॅंकेत किती काळा पैसा जमा झाला, देशाच्या आर्थिक तोट्याचे प्रमाण काय आहे, अशा प्रश्‍नांची उत्तरे मोदी यांनी द्यावीत,'' असेही त्या म्हणाल्या. 

नोटाबंदी हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याची टीका शिंदे यांनी केली. त्या म्हणाल्या, ""भाजपच्या कार्यकर्त्यांकडेच नवीन नोटा कशा सापडत आहेत. नोटाबंदीच्या विरोधात बोलले, तर आपल्याला देशद्रोही ठरवतील, अशी भीती असल्याने देशात एकप्रकारे हुकूमशाहीची परिस्थिती आहे.'' 

नोटाबंदीच्या विरोधात कॉंग्रेस आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. त्यामध्ये समविचारी पक्षही सहभागी होतील. आम्ही एकत्रितपणे विरोधात आंदोलन करू, असेही शिंदे यांनी सांगितले. 

नोटाबंदी बड्या कंपन्यांसाठीच 
प्रत्येक डिजिटल पेमेंटवर अडीच टक्के सरचार्ज लावला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पेटीएमचे "ब्रॅंड ऍम्बेसिडर' असल्यासारखे आहेत. त्यातील पेमेंटवरील सरचार्जचा फायदा घेण्यात येणार आहे. तसेच, रिलायन्सने जिओ मोफत देऊन आपले जाळे वाढविले आहे. त्यामुळे हा निर्णय या बड्या कंपन्यांसाठीच घेतला असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी या वेळी केला. 

Web Title: Prime Minister public apology - praniti shinde