आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढ व आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य - आयुष प्रसाद प्रकल्पधिकारी    

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

सोमतवाडी येथे घोडेगाव प्रकल्प अतंर्गत आश्रम शाळेतील दहावी व बारावीच्या मुलींसाठी १६ एप्रिलपासून उन्हाळी सुट्टीतील निवासी जादा अभ्यास वर्गाचे नियोजन केले आहे.

जुन्नर - शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्तावाढ, क्रीडा व आरोग्यासाठी प्रकल्प कार्यालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यास विद्यार्थी व शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी पालकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे केले.

सोमतवाडी ता. जुन्नर येथे शासकीय कन्या आश्रमशाळेत पत्रकारांना माहिती देताना ते बोलत होते. सहाय्यक प्रकल्पअधिकारी दीपक कालेकर, आर. बी. पंडुरे, मुख्याध्यापिका एस. एस. कांबळे यावेळी उपस्थित होते. सोमतवाडी येथे घोडेगाव प्रकल्प अतंर्गत आश्रम शाळेतील दहावी व बारावीच्या मुलींसाठी १६ एप्रिलपासून उन्हाळी सुट्टीतील निवासी जादा अभ्यास वर्गाचे नियोजन केले आहे. या वर्गात १९ आश्रमशाळेती दहावीच्या २९३ व पाच आश्रम शाळेतील बारावीच्या ७४ विद्यार्थिनी सहभागी झाल्या असून इंग्रजी, गणित, विज्ञान, अर्थशास्त्र विषयासाठी तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करत आहेत. सकाळी योगाचे वर्ग घेण्यात येतात.या विद्यार्थ्यांना चांगला आहार दिला जातो तसेच त्यांची आरोग्य तपासणी नियमित केली जात आहे. मात्र काही पालक मधूनच आपल्या मुलींना घेऊन जात असल्याचे आढळून आल्याने त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी तज्ञ शिक्षकाकडून तयार करून घेतलेले प्रश्नपत्रिका संचाचे बारावीच्या विद्यार्थिनींना वाटप करण्यात आले. प्रकल्पधिकारी आयुष यांनी मार्गदर्शन केले.

दहावी व बारावीच्या मुलांसाठी घोडेगाव ता.आंबेगाव येथे  अभ्यास शिबीर सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. राजपुर ता.आंबेगाव येथे १५ एप्रिल पासून उन्हाळी क्रीडा शिबीर आयोजित केले असून यात तीनशे खेळाडू सहभागी झाले आहेत असेही त्यांनी सांगितले.
प्रकल्पातील प्रत्येक शाळेत दत्तक पालक योजना राबविण्यात आली आहे.विभागीय क्रीडा स्पर्धेत सोनावळे व घोडेगाव येथे सराव शिबिरे घेतल्याने ३३ विद्यार्थ्यांची राज्य पातळीवर निवड झाली. प्रकल्पस्तरीय वसतिगृहाच्या क्रीडास्पर्धा राज्यात प्रथमच घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. राजपुर शाळेला क्रीडा संकुल तयार करण्यासाठी ६२ लाख ३५ हजार निधी मंजूर झाला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priority will be given to quality and health problems of tribal students