येरवडा कारागृहात कैद्याने दिली पोलिसाला जीवे मारण्याची धमकी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

आत्तापर्यंत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची आपापसात भांडणे होण्याचा प्रकार सुरू होता. मात्र शनिवारी एका कैद्यास त्याच्या नातेवाईकासमवेत बोलण्याची वेळ संपली असल्याचे सांगणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्यालाच कैद्याने जीवे मारण्याची धमकी दिली.

पुणे : आत्तापर्यंत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची आपापसात भांडणे होण्याचा प्रकार सुरू होता. मात्र शनिवारी एका कैद्यास त्याच्या नातेवाईकासमवेत बोलण्याची वेळ संपली असल्याचे सांगणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्यालाच कैद्याने जीवे मारण्याची धमकी दिली. केवळ तेवढ्यावरच न थांबता त्याने अंतर्गत दुरध्वनी संचही (इंटरकॉम) फोडून टाकल्याचा प्रकार पुढे आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता घडली असून याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संदिप संसारसिंग धुने (रा. येरवडा मध्यवर्ती कारागृह) असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमाजी कोकाटे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. येरवडा कारागृहातील मुलाखत कक्षाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

कारागृह प्रशासनाकडून मुलाखत कक्षातील इंटरकॉमद्वारे कैदी व त्यांच्या नातेवाईकांमध्ये ठराविक वेळेमध्ये बोलणे करवून दिले जाते. त्यानुसार, कारागृहामध्ये एका गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या संदिप धुने यास शनिवारी सकाळी अकरा वाजता त्याच्या नातेवाईकांसमवेत बोलण्यासाठी मुलाखत कक्षातील मुलाखत खिडकी क्रमांक पाच मध्ये आणण्यात आले होते. धुने याचे त्याच्या नातेवाईकांशी बोलणे सुरू होते. मात्र त्याला दिलेली वेळ संपल्याने फिर्यादी यांनी त्यास वेळ संपल्याबाबत समज देऊन त्यास जाण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी इंटरकॉमचे मुख्य बटण बंद केले. त्यामुळे धुने याने चिडुन ते बटण पुन्हा सुरु केले. तसेच मी मनोरुग्ण असून सर्वकाही तोडून-फोडून टाकेल, तुलाही जीवे मारेल, अशा शब्दात त्याने फिर्यादींना धमकी दिली. त्यानंतरही फिर्यादी यांनी इंटरकॉमचे बटण बंद केले. त्यानंतर धुने याने इंटकॉम संच खाली आपटून फोडून टाकला. तसेच फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमारे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prisoner threatens to kill police officer at Yerawada jail