उत्पन्नवाढीची घोषणा फसवी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

सोमेश्वरनगर - ‘मला सगळं कळतं नि सगळं मी करणार’ हा अहंकार चांगला नाही. मागील वर्षी कृषी उत्पन्नात ८.३ टक्के घट असताना सन २०२२ मध्ये कृषी उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा फसवी आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. 

सोमेश्वरनगर - ‘मला सगळं कळतं नि सगळं मी करणार’ हा अहंकार चांगला नाही. मागील वर्षी कृषी उत्पन्नात ८.३ टक्के घट असताना सन २०२२ मध्ये कृषी उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा फसवी आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. 

येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन व कै. बाबालाल काकडे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण चव्हाण, खासदार राजू शेट्टी व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार संभाजीराव काकडे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार विजयराव मोरे, श्‍यामकाका काकडे, शिवाजीराव भोसले, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक, शहाजी काकडे, सतीश खोमणे, प्रमोद काकडे आदी या वेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी ३४ हजार कोटींची कर्जमाफी देणार, असे सांगितले. मात्र १२-१३ हजार कोटीच दिले आहेत. विधिमंडळात, संकेतस्थळावर त्याची माहिती देत नाहीत. कर्नाटक-गुजरातमध्ये शेतकऱ्याला अनुदान देतात, शाळांत दूधभुकटी देतात मग इथे का करत नाही, असे सवाल चव्हाण यांनी उपस्थित केले. 

सन २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट व्हायला दरवर्षी ११ ते १२ टक्के उत्पन्नवाढ हवी, हे कुणीही सांगेल. उलट उत्पन्न घटत आहे. परदेशात एका विद्यापीठ नुसत्या संशोधनावर नऊ हजार कोटी खर्च करतात. मात्र, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय वीस विश्वविद्यालये उभारायला नाममात्र एक हजार कोटी देत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

‘चव्हाण फार काळ ‘माजी’ राहणार नाहीत. शेतकरी व कारखानदार एकत्र आले तर आताच्या सरकारची थडगी बांधल्याशिवाय राहणार नाही,’

 असा इशारा शेट्टी यांनी दिला. प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जया कदम व प्रा. अच्युत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

पन्नास कोटींत विश्‍वविद्यालय?
जगात पहिल्या दोनशेत देशातील एकही विद्यापीठ नाही. मनुष्यबळ विकास मंत्रालय पन्नास कोटींत विश्वविद्यालय उभारायची घोषणा करते; पण पन्नास कोटींत जागतिक दर्जाचे विद्यापीठ होत नाही, हे मंत्रिमहोदयांना माहीत नाही का’ असा सवाल करत प्रकाश जावडेकरांचाही समाचार घेतला. 

लोक यांना कंटाळले...
केंद्रीय गृहमंत्री परदेशात असताना काश्‍मीर आघाडी तोडली जाते. अर्थमंत्र्यांना माहीत नसताना नोटाबंदीचा निर्णय होतो. अशा प्रकारे हे सरकार लोकशाही संस्था मोडीत काढत आहे. लोक यांना कंटाळले आहेत. आधी लोक आम्हाला ‘आता वीस वर्ष विसरा’ असं म्हणायचे. आम्हालाही खरं वाटायचं. पण हे सरकार अपयशी ठरले असून २०१९ मध्ये निश्‍चित आम्ही आहोत, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

Web Title: Prithviraj Chavan Someshwar Nagar