दिवाळीमुळे खासगी बसचालकांकडून दरवाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

दिवाळीनिमित्त प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचालकांनी दरवाढ सुरूच ठेवली असून, प्रवासी त्रस्त झाले आहेत. विशेषतः नागपूर, गोवा, इंदूर आदी मार्गांवरील दर वाढवण्यात आले आहेत. असे असतानाही 22 ते 29 ऑक्‍टोबर दरम्यान सर्वच गाड्या फुल्ल झाल्या आहेत. 

पुणे - दिवाळीनिमित्त प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचालकांनी दरवाढ सुरूच ठेवली असून, प्रवासी त्रस्त झाले आहेत. विशेषतः नागपूर, गोवा, इंदूर आदी मार्गांवरील दर वाढवण्यात आले आहेत. असे असतानाही 22 ते 29 ऑक्‍टोबर दरम्यान सर्वच गाड्या फुल्ल झाल्या आहेत. 

नागपूरसाठी एरवी 800 ते 1000 रुपये प्रतिप्रवासी दर असतो, तो 1500 ते 1800 रुपयांवर पोचला आहे. अमरावतीसाठीही 800 ते 1000 रुपयांवरून 1400 ते 1600 रुपये, अकोल्यासाठी 800 रुपयांवरून 1200 ते 1500 रुपये दर झाला आहे. गोव्यासाठी 800 वरून 1500 रुपयांपर्यंत, इंदूरसाठी 1000 वरून 1800 ते 2000 रुपयांपर्यंत दर पोचले आहेत. जळगाव, धुळे, चाळीसगाव, लातूर, बीड, नांदेड आदी मार्गांवरही नेहमीच्या प्रवासीभाड्यापेक्षा सुमारे दीडपटीने दर वाढले आहेत. 

अन्य जिल्ह्यांतून तसेच राज्यांतून शिक्षण, व्यवसाय, नोकरीसाठी पुण्यामध्ये येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. दिवाळीनिमित्त त्यांनी 20 ऑक्‍टोबरपासूनच आपापल्या गावी परतण्यास सुरवात केली. रेल्वे, एसटीचे आरक्षण या पूर्वीच फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची पावले खासगी बसकडे वळली आहेत. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे आदी ठिकाणांवरून पुण्यात परतण्यासाठीही 1 नोव्हेंबरपासून आरक्षण सुरू झाले आहे; परंतु 10 नोव्हेंबरपर्यंत हेही दर चढेच आहेत. 

या बाबत मूळचे अमरावतीचे असलेले परंतु, सध्या पुण्यात राहणारे भगवान मोरे म्हणाले, ""पत्नी आणि दोन मुलांसह घरी जायचे आहे. एसटी, रेल्वेचे आरक्षण 15 ऑक्‍टोबरपासूनच फुल्ल झाले आहे. म्हणून खासगी बसकडे चौकशी केली, तर एक तिकीट 1500 ते 1800 रुपयांपर्यंत पोचले आहे. येतानाही तेवढाच दर आहे. चौघांच्या प्रवासासाठी किमान 12 हजार लागतील. हे परवडणारे नाही.'' 

आमच्या संघटनेचे सदस्य न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी बसच्या प्रवासी भाड्यापेक्षा दीडपटीपर्यंतच भाडे आकारणी करतात. सीझनमुळे नवे ठेकेदार जादा बस आणतात आणि ते मनमानी करतात. त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई न करता, त्यांच्या बस थांबवून ठेवल्या पाहिजेत. 
बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष, पुणे डिस्ट्रिक्‍ट लक्‍झरी बस असोसिएशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private bus drivers increase rates