भाडेवाढीमुळे प्रवासी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पुणे - सुट्यांचा हंगाम आणि लग्नसराईमुळे खासगी बसचालकांनी प्रवासी वाहतुकीचे भाडे किमान ३० ते ५० टक्‍क्‍यांनी वाढविले आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या भाडेवाढीवर कोणीतरी अंकुश आणावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. केवळ राज्यांतर्गतच नव्हे, तर राज्याबाहेरील प्रवासाचे दरही वाढले आहेत. 

पुणे - सुट्यांचा हंगाम आणि लग्नसराईमुळे खासगी बसचालकांनी प्रवासी वाहतुकीचे भाडे किमान ३० ते ५० टक्‍क्‍यांनी वाढविले आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या भाडेवाढीवर कोणीतरी अंकुश आणावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. केवळ राज्यांतर्गतच नव्हे, तर राज्याबाहेरील प्रवासाचे दरही वाढले आहेत. 

शिक्षण आणि नोकरी, व्यवसायानिमित्त पुण्यात राहणाऱ्या युवकांची, नागरिकांची संख्या वाढत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून परीक्षा संपायला सुरवात होते. तसेच लग्नसराईही सुरू झाली आहे. त्यामुळे गावाकडे परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रेल्वेचे आरक्षण दोन ते तीन महिने अगोदर केले, तर मिळते. परंतु अनेकांचे गावी जाण्याचे बेत त्यानंतर ठरतात. त्यामुळे आरक्षण मिळण्याची शक्‍यता नसते. सहा ते आठ तासांपेक्षा जास्त दूरच्या प्रवासासाठी एसटी बसमध्ये पुरेशा सुविधा नसतात. त्यामुळे खासगी बसकडे प्रवाशांचा ओढा आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, तसेच जळगाव, धुळे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, रत्नागिरी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आदी शहरांतून पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हैदराबाद, अहमदाबाद, इंदोरमधूनही पुण्यात ये-जा मोठ्या प्रमाणात होते. 

सध्या सुट्यांमुळे प्रवासी भाड्यात किमान ३० ते ५० टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. शनिवार- रविवारी तर नेहमीपेक्षा दुप्पट भाडे आकारले जाते, अशी प्रवाशांची तक्रार आहे. खासगी बस वाहतूकदारांच्या भाडेवाढीवर सध्या कोणत्याही शासकीय यंत्रणेचे निर्बंध नाहीत. त्यांनी किती भाडे आकारावे, यासाठी कोणतेही धोरण नसल्याने आम्ही त्याबाबत ‘हेल्पलेस’ आहोत, असे ‘आरटीओ’चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी सांगितले. 

याबाबत रॉयल- चिंतामणी ट्रॅव्हल्सचे संचालक प्रताप एदासानी म्हणाले, ‘‘सुट्यांच्या सुरवातीला गावांकडे जाणाऱ्या, तर सुट्या संपत आल्यावर पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांची गर्दी मोठी असते. त्यामुळे परतणाऱ्या गाड्यांमध्ये पुरेसे प्रवासी नसतात. त्यामुळे तिकिटांचे दर काहीसे वाढवून संतुलन साधावे लागते. ऑफसिझनमध्ये एसटीपेक्षा कमी दराने आम्ही सेवा पुरवितो. त्यातच डिझेलचे वाढलेले दर, टोल, सुट्याभागांचा खर्च, कर, मनुष्यबळावरील खर्च वाढत आहे. परिणामी, गर्दीच्या वेळी म्हणजे एप्रिल-मेच्या सुट्या अन्‌ दिवाळीच्या सुट्यांतच वाहतूकदारांना वर्षाचा खर्च भरून काढावा लागतो.’’

प्रमुख मार्गांवर वाढलेले प्रवासी भाडे 
कंसात नेहमीचे भाडे आणि पुढे वाढलेले दर

 गोवा....................... (१०००-१२०० रुपये) १५००-१६०० 
 अहमदाबाद.............................. (१५००) २५००-३०००
 हैदराबाद................................. (१०००) १२००-१४००
 नागपूर............................ (९००-१२००) १५००- १७००
 अमरावती................................. (८००) १२००- १५००
 जळगाव............................................. (५००) ७००
 रत्नागिरी........................... (६००-७००) ८००-१०० रुपये

 शिक्षणासाठी मी पुण्यात आलो आहे. चंद्रपूरला जाण्यासाठी थेट एसटी नाही, रेल्वेचे आरक्षण मिळत नाही. सुट्यांच्या हंगामात १०००-१२०० रुपयांचे तिकीट अगदी २००० ते २५०० रुपयांपर्यंत जाते. त्या वेळी इतके भाडे द्यायचे जिवावर येते. तरीही नाइलाजाने प्रवास करावा लागतो.
-पुष्पक बोराडे, प्रवासी, चंद्रपूर

Web Title: private bus rent increase passenger