स्वारगेट स्थानकात खासगी बस कंपन्यांची घुसखोरी 

स्वारगेट स्थानकात खासगी बस कंपन्यांची घुसखोरी 

पुणे : स्वारगेट एसटी बसस्थानकात खासगी प्रवासी कंपनीच्या एजंटांची घुसखोरी वाढत चालली आहे. प्रवाशांना वेगवेगळी आमिषे दाखवून स्वतःच्या वाहनात भरले जाते. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकाराबाबत एसटी प्रशासनाने पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलिस लक्ष घालत नसल्याने त्याचा फटका एसटी प्रशासनाला बसत आहे. 

शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या स्वारगेट बसस्थानकात वर्दळीचे प्रमाण खूप अधिक आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून एसटी बस येथे येत असतात. दररोज हजारो बसचा येथे राबता असतो. आधीच बसस्थानकातील जागा कमी पडत आहे. त्यातच खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांचा येथे मोठ्या प्रमाणात शिरकाव वाढला आहे. खासगी वाहनधारक, एजंट प्रवासी मिळण्यासाठी बसस्थानकात गराडा घालत असतात. प्रवाशांना वेगवेगळी आमिषे दाखवून तेथून आपल्या बसमध्ये घेतले जाते. त्यामुळे एसटीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. एकप्रकारे एसटीच्या प्रवाशांची लूट केली जात आहे.

बसस्थानकाचे कर्मचारी या वाहनधारकांना वेळोवेळी बाहेर जाण्याच्या सूचना करीत असतात. पण, त्यांच्या सूचनेला ते जुमानत नाहीत. अरेरावीची भाषा वापरून दादागिरी केली जाते. स्थानकात घुसून प्रवासी भरले जातात, तसेच स्थानकाच्या मध्यापर्यंत वाहने आणली जातात. अस्ताव्यस्त पार्किंग करून प्रवासी मिळविण्यासाठी स्थानकात गराडा सुरू असतो. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो. याबाबतच्या अनेक तक्रारी बसस्थानकाने पोलिसांकडे केल्या आहेत. मात्र, पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. 

''आम्ही खासगी वाहनांना बाहेर काढण्यासाठी आमचे काही कर्मचारी ठेवले आहेत. पण, खासगी वाहनधारक त्यांना दाद देत नाहीत. अरेरावी करतात. त्यामुळे पोलिसांनी यात लक्ष घालणे आवश्‍यक आहे.''
- सचिन शिंदे, व्यवस्थापक, स्वारगेट बसस्थानक 

''आमची कारवाई नियमित सुरू असते. पण, कारवाई होऊनसुद्धा वाहने आतमध्ये जातात. त्यामुळे ही समस्या उद्‌भवते. मी स्वतः यात लक्ष घालून आहे. यापुढे कारवाई आणखी कडक करू.''
- प्रभाकर ढगे, वाहतूक पोलिस निरीक्षक, स्वारगेट 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com