क्‍लासची सुरक्षितता ना ध्यानी, ना मनी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

पुणे - तुमचा मुलगा किंवा मुलगी खासगी क्‍लासला जातात का, या प्रश्‍नाचे उत्तर ‘होय’ असेल, तर जरा इकडे लक्ष द्या! यासाठी आपण दरवर्षी हजारो रुपये खर्च करतो. मुलांना क्‍लास लावताना शिकविण्याच्या पद्धतीला प्राधान्य दिले जात असले, तरी आता मात्र ‘क्‍लासमधील सुरक्षितता’ पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण खासगी क्‍लासच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

पुणे - तुमचा मुलगा किंवा मुलगी खासगी क्‍लासला जातात का, या प्रश्‍नाचे उत्तर ‘होय’ असेल, तर जरा इकडे लक्ष द्या! यासाठी आपण दरवर्षी हजारो रुपये खर्च करतो. मुलांना क्‍लास लावताना शिकविण्याच्या पद्धतीला प्राधान्य दिले जात असले, तरी आता मात्र ‘क्‍लासमधील सुरक्षितता’ पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण खासगी क्‍लासच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

मागील आठवड्यात सुरतमधील कोचिंग सेंटरला आग लागल्याची घटना घडली. त्यात अनेक विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने सर्वेक्षणाद्वारे प्रातिनिधिक स्वरूपात मते जाणून घेतली. यात त्यांना खासगी क्‍लासबद्दल प्रश्‍न विचारण्यात आले. त्यात ‘मुलांना खासगी क्‍लास लावताना पालक म्हणून कशाला प्राधान्य दिले जाते?’ याबाबत प्रश्‍न विचारले असता, जवळपास ६४.२० टक्के पालकांनी शिकविण्याच्या पद्धतीवर भर दिला जात असल्याचे सांगितले. त्याखालोखाल मुलांचा क्‍लास 

हा शाळेजवळ किंवा महाविद्यालयाजवळ आहे का, हे पाहिले जाते, असे २६.९०टक्के पालकांनी सांगितले. परंतु क्‍लासमधील पायाभूत सुविधांबाबत पालकांचा दृष्टिकोन गौण असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले.

क्‍लासमध्ये मुला किंवा मुलगी जात असेल, तर त्याची सुरक्षा म्हणून क्‍लासचा आवार आणि आजूबाजूचा परिसर प्राधान्याने पाहत असल्याचे पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक पालकांनी सांगितले. अर्थात, हा परिसर महत्त्वाचा असला, तरीही प्रत्यक्ष क्‍लास रूममधील सुरक्षिततेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे यातून निदर्शनास आले.

पहिले ते पाचवी, पाचवी ते दहावी, बारावी आणि अन्य स्पर्धा परीक्षांचे मिळून हजारो क्‍लासचे जाळे शहरात विस्तारलेले आहेत. त्यांची नोंद होत नसल्याने ठोस आकडेवारीही मिळणे अशक्‍य आहे. साधारणत: एक हजारांपासून सुरू होणारी क्‍लासची ही फी स्पर्धा परीक्षांच्या क्‍लासचा विचार 
करता लाखोंच्या घरात पोचली आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील अनेक क्‍लास ‘नापास’च्या यादीत असल्याचे पालकांनी सांगितले.

मुलांना क्‍लास लावताना शिकविण्याच्या पद्धतीकडे जास्त लक्ष दिले जाते. मात्र हजारो रुपये फी भरूनही क्‍लासमध्ये मुलांसाठी पुरेशी सुरक्षितता आणि इतर सुविधा नसतात हे वास्तव आहे. क्‍लासची फी आणि देण्यात येणाऱ्या सुविधा यात मोठी तफावत असते. मात्र सुरतमधील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आता क्‍लासमधील सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहणे तितकेच गरजेचे आहे.
- चेतना पवार, पालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private Class Security Child