खासगी कंपनीच्या संचालकाचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

पिंपरी - खासगी कंपनीच्या संचालकाचे मंगळवारी अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर केडगाव-चौफुला येथे त्यांना सोडून अपहरणकर्ते पळून गेले. 

पिंपरी - खासगी कंपनीच्या संचालकाचे मंगळवारी अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर केडगाव-चौफुला येथे त्यांना सोडून अपहरणकर्ते पळून गेले. 

डॉ. शिवाजी पडवळ (वय ५५, रा. धायरी) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. डॉ. पडवळ हे मरकळ येथील राठी पॉलिबॉड कंपनीचे संचालक असून, ते कंपनीच्या कारमधून घरी चालले होते. त्यांच्या मागावर असलेल्या दोघांनी चऱ्होली येथे त्यांची मोटार अडविली व मोटार चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर मोटारीसह त्यांचे अपहरण केले. नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे सर्व पथके घटनास्थळी दाखल झाली. आरोपींची दुचाकी घटनास्थळी सापडली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला. आरोपी जात असलेल्या मार्गावरील पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. आरोपी आणि पोलिस यांच्यातील अवघे २० मिनिटांचे राहिले असताना आरोपींनी पोलिसांना गुंगारा दिला. तसेच रात्री साडेदहाच्या सुमारास डॉ. पडवळ यांच्या भावाला मोबाईलवर फोन आला. त्यावरून अपहरणकर्त्यांनी डॉ. पडवळ यांना केडगाव चौफुला येथील पंजाबी ढाब्याजवळ सोडल्याचे पोलिसांना समजले.

गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम तांगडे यांनी अवघ्या दहा मिनिटांमध्ये डॉ. पडवळ यांना ताब्यात घेतले. अपहरणकर्त्यांनी मारहाण केल्याने ते जखमी झाले होते. त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचार करून दिघी येथे त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राठी कंपनीत काम करणाऱ्या दोन कामगारांना चोरी करतात म्हणून कामावरून काढून टाकले होते. त्यांनी अपहरण केले असावे, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली.

Web Title: Private Company Director Kidnapping Crime