खासगी रुग्णालयांचाही नकार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

पुणे - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये सकाळपासून तणावाचे वातावरण होते. स्पेशालिस्ट डॉक्‍टरांच्या बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांची गर्दी कमी झाली होती. फक्त तातडीच्या वैद्यकीय सेवेच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे चित्र शहरात दिसत होते. 

पुणे - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये सकाळपासून तणावाचे वातावरण होते. स्पेशालिस्ट डॉक्‍टरांच्या बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांची गर्दी कमी झाली होती. फक्त तातडीच्या वैद्यकीय सेवेच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे चित्र शहरात दिसत होते. 

शहरातील मोठ्या रुग्णालयांमधून घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांच्या उपचाराचे बिल भरण्यासाठी नातेवाइकांनी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल आणले होते. मंगळवारी (ता. 8) मध्यरात्रीपासून या नोटा चलनातून बंद केल्याने खासगी रुग्णालयाच्या प्रशासनाने हे पैसे स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णालयाच्या बिलिंगचे कर्मचारी आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यात वाद झाले. 

याबाबत बोलताना रुग्णाचे नातेवाईक सागर भोसले म्हणाले, ""रुग्णाला बुधवारी (ता. 9) घरी सोडणार असल्याचे डॉक्‍टरांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी (ता. 8) बॅंकेतून पैसे काढले. आता हे पैसे रुग्णालयात चालत नसल्याने ते रुग्णाला घरी सोडायला तयार नाहीत.'' 

सरकारी रुग्णालयांमधून जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चालतील, खासगी रुग्णालये त्यासाठी अपवाद असतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार थांबविले असून, कार्ड, ऑनलाइन ट्रान्स्फर किंवा डिमांड ड्राफ्ट याने पैसे स्वीकारले जात असल्याचे काही रुग्णालयांनी सांगितले. 

याबाबत डॉ. नितीन भगली म्हणाले, ""आज दिवसभरात रुग्णांच्या सर्व नातेवाइकांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बिल भरण्यासाठी आणल्या होत्या. एकही शंभर रुपयांची नोट रुग्णाच्या नातेवाइकांनी दिली नाही. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची सविस्तर नोंद घेऊन हे सर्व पैसे स्वीकारण्यात आले. तसेच काही रुग्णांनी धनादेशाद्वारेही बिलाची रक्कम दिली.'' 

पंतप्रधान मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याची माहिती दिल्यानंतर या नोटा स्वीकारण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी खासगी रुग्णालयांना दिल्याची माहिती मिळाली. त्यामुळे नेमक्‍या कोणत्या आदेशाची अंमलबजावणी करायची, असा प्रश्‍न काही वेळा निर्माण झाल्याचेही डॉ. भगली यांनी सांगितले. 

औषध विक्रेता संघटनेच्या पश्‍चिम विभागाचे खजिनदार अनिल बेलकर म्हणाले, ""औषधे ही अत्यावश्‍यक सेवा आहे. त्यामुळे रुग्णांना औषधे देण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी काही औषधे उधारीवर देण्यात आली, तर काहींकडून पैसे घेण्यात आले; पण त्या ग्राहकांच्या फोन नंबरसह सविस्तर माहिती घेऊन त्यांना औषधे देण्यात आली.'' 

"ऍडव्हान्स' भरण्यासाठी रांगा 

शहरातील काही प्रमुख रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी "ऍडव्हान्स' पैसे भरण्यासाठी नातेवाइकांनी रांगा लावल्या होत्या. हे सर्व जण पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रुग्णालयात भरत होते. 

Web Title: Private hospital refused