कोथरूडमध्ये खासगी मंडई तेजीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

महापालिकेने 2001 मध्ये सुमनताई माथवड भाजी मंडई बांधली असून, यामध्ये 101 गाळे आहेत. येथे सध्या फक्त 22 विक्रेते व्यवसाय करत आहेत. येथील बहुतांशी विक्रेत्यांनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले आहे.

पुणे : राजकीय वरदहस्तातून कोथरूडमधील खासगी मंडई जोरात सुरु आहे, मात्र महापालिकेची सुमनताई माथवड भाजी मंडई बंद पडण्याची मार्गावर आहे. सुतार दवाखान्याच्या एका बाजूला महापालिकेने उभारलेली मंडई आहे, तर दुसऱ्या बाजूला रस्त्यालगत मधुकर थरकुडे यांच्या जागेवर खासगी मंडई आहे. महापालिकेची मंडई आतील बाजूस असल्याने ग्राहक खरेदीसाठी तेथे फिरकत नाहीत. रस्त्यालगत असलेल्या खासगी मंडईकडे ग्राहकांचा ओढा अधिक आहे. 

महापालिकेने 2001 मध्ये सुमनताई माथवड भाजी मंडई बांधली असून, यामध्ये 101 गाळे आहेत. येथे सध्या फक्त 22 विक्रेते व्यवसाय करत आहेत. येथील बहुतांशी विक्रेत्यांनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. त्यामुळे भाजी मंडई ओस पडू लागली आहे. त्यातच मंडईत व्यवसाय होत नसल्याने रस्त्यावर येऊन दुकान थाटण्याशिवाय येथील विक्रेत्यांकडे पर्याय नसल्याचे चित्र आहे. 

येथील खासगी मंडईस संरक्षण देण्याबाबतचे शिफारसपत्र माजी नगरसेवक शाम देशपांडे आणि दामोदर कुंबरे यांनी महापालिकेस दिले होते. त्यामुळे महापालिकेचे खासगी मंडईवर कारवाई करण्याचे धाडस होत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

एकीकडे महापालिका पथारीवाले रस्त्यावर बसतात म्हणून त्यांच्याकडून दंड आकारते, तर दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने अवैधरीत्या चालणाऱ्या मंडईवर कारवाई केली जात आहे. याबाबत 2005 मध्ये मंडईतील गाळेधारक उपोषणास बसले होते. तेव्हा खासगी मंडईवर कारवाई करण्याचे आश्‍वासन गाळेधारकांना देण्यात आले होते. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशी तक्रार गाळेधारक करत आहेत. 

दुसरीकडे खासगी जागेवर चालणाऱ्या अवैध मंडईत दररोज 200 रुपये भाडे देऊन सुमारे 50 विक्रेते व्यवसाय करत आहेत. महापालिकेकडून कोणताही परवाना न घेता येथे मंडई थाटण्यात आली आहे. 

- बापू लोळे, भाजी विक्रेते 

खासगी मंडईचे अंतर शंभर मीटरपेक्षा कमी असून, अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते जास्त दाखवले जात आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही आश्‍वासनाशिवाय आतापर्यंत काहीही मिळालेले नाही. 

- उद्धव गायकवाड, भाजी विक्रेते 

Web Title: Private Vegetables Markets Are in Raising in Kothrud