खासगी वाहनांवर कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

बसस्थानक व स्थानक परिसरातील बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. परिसरामध्ये दिवस-रात्र पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत. दररोज साधारणपणे अशा ३० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.
- प्रभाकर ढगे, पोलिस निरीक्षक, स्वारगेट वाहतूक विभाग

पुणे - शहरातील एसटी बसस्थानकांना खासगी वाहतुकीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत तीन दिवसांमध्ये स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये सुमारे शंभर खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकाने मोकळा श्‍वास घेतला आहे.

शहरातील एसटी बसस्थानकातून होणाऱ्या खासगी वाहतुकीसंदर्भात ‘सकाळ’मध्ये १८ मे रोजी वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी एसटी स्थानक आणि परिसरातून खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली. यामध्ये स्वारगेट बसस्थानकात जाणाऱ्या रिक्षा, मोटार, दुचाकी यांच्यासह स्थानक परिसरातील खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. खासगी वाहतुकीविरोधात वेळोवेळी वाहतूक पोलिसांकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले होते. स्थानक परिसरामध्ये खासगी वाहनांवर नियमितपणे कारवाई केली जात आहे. स्वारगेट बसस्थानकासह शिवाजीनगर, पुणे स्टेशन बसस्थानक परिसरात दररोज २५ ते ३० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private Vehicle Crime