खासगी वाहनांचे पार्किंग रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

पुणे - खासगी ट्रॅव्हल्ससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिस आणि महापालिका यांच्याकडून अद्याप ‘पिकअप’ची ठिकाणे निश्‍चित करण्यात अालेली नाहीत.त्यामुळे शहरातील खासगी ट्रॅव्हल कंपन्यांकडून भरदिवसा तसेच रात्री वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावरच गाड्या उभ्या केल्या जात आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतानाही प्रशासन त्यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही.

पुणे - खासगी ट्रॅव्हल्ससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिस आणि महापालिका यांच्याकडून अद्याप ‘पिकअप’ची ठिकाणे निश्‍चित करण्यात अालेली नाहीत.त्यामुळे शहरातील खासगी ट्रॅव्हल कंपन्यांकडून भरदिवसा तसेच रात्री वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावरच गाड्या उभ्या केल्या जात आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतानाही प्रशासन त्यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही.

स्वारगेट येथील उड्डाण पुलावर सर्रास ट्रॅव्हल्स उभ्या असतात; पण त्यांच्याकडे प्रशासनकडून डोळेझाक होत आहे. शहरात अन्य बसस्थानकाच्या आसपास हीच परिस्थिती पाहायला मिळते. मध्यंतरी एसटी स्थानकांच्या दोनशे मीटरच्या परिसरात या वाहनांना थांबण्यास बंदी घालण्यात आली, असे असतानाही अनेकदा या गाड्या स्थानकापासून काही अंतरावरच थांबलेल्या असतात. रात्री नऊनंतर शहराच्या अनेक भागांत रस्त्यावरच गाड्या उभ्या करून तेथून प्रवाशांना पिकअप करतात.

अद्याप जागानिश्‍चिती नाही
पार्किंग आणि प्रवाशांना पिकअप करण्यासाठी शहरात जागा निश्‍चित करून द्याव्यात, अशी गेल्या अनेक वर्षांपासून खासगी ट्रॅव्हल कंपन्यांची मागणी आहे. याबाबत न्यायालयातही याचिका दाखल झाली होती. त्यावर या गाड्यांना पिकअप पॉइंट आणि पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश न्यायालयाने यापूर्वीच दिले होते. त्यानुसार महापालिकेने नदीपात्रातील जागेसह चार ठिकाणी जागा निश्‍चित करून दिल्याही, परंतु नदीपात्रातील जागेवर आक्षेप आल्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. दरम्यान, राज्य सरकारनेही खासगी कंपन्यांना जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात अध्यादेश काढला. मात्र, त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.

भरदिवसा गाड्या रस्त्यावर
दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. सुट्यांचे दिवस असल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली असून, त्याचा फायदा अनेक ट्रॅव्हल कंपन्या घेत आहेत. स्वारगेट येथील नटराज हॉटेल, मित्रमंडळ, पुणे स्थानकाच्या मागील बाजूस सोराबजी हॉलसमोर, येरवडा, हडपसर अशा अनेक ठिकाणी ट्रॅव्हल कंपन्यांकडून भरदिवसा रस्त्यावर गाड्या उभ्या करून प्रवासी पिकअप केले जातात. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही.

खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांना पार्किंगसाठी जागा आणि प्रवाशांना पिकअप करण्यासाठी पॉइंट ठरवून देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या संदर्भात न्यायालयाने आदेश दिले, राज्य सरकारनेही दोन वेळा अध्यादेश काढले. असे असतानाही आम्हाला जागा मिळत नाही. पार्किंगसाठी खासगी जागा भाडेतत्त्वावर घ्यावी लागते. शहरातून या वाहनांना प्रवास करण्यास बंदी नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना पिकअप करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर थांबावे लागते.
- बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष, पुणे डिस्ट्रिक्‍ट लक्‍झरी बस असोसिएशन

ट्रॅव्हल्स कंपन्यांना परवानगी देताना त्यांच्याकडून जो करारनामा सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये पिकअप पॉइंटचा उल्लेख आहे. प्रवाशांना पिकअप करण्यासाठी स्वतंत्र अशा कोणत्याही पॉइंटला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशी कोणतीही कृती ट्रॅव्हल कंपन्यांनी करू नये.
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

बस स्थानकाच्या दोनशे मीटर अंतरापर्यंत खासगी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि इतर वाहनांना थांबण्यास बंदी आहे. या वाहनांच्या थांब्यासाठी पॉइंट निश्‍चित केलेले आहेत. हडपसर गाडीतळ येथील खासगी वाहनांवर नुकतीच कारवाई केली असून, त्यांना तेथून काही अंतरावर दुसरीकडे जागा दिली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येईल.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस उपायुक्‍त (वाहतूक)

Web Title: Private vehicles parking on the road