येत्या आठवड्यात पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

वाऱ्याचा प्रवाह काहीसा मंदावल्याने राज्यात पावसाने उघडीप घेतली होती. येत्या आठवड्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे.

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या आगमनानंतर पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळिराजाला सोमवारपासून (ता. 18) दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. येत्या आठवड्यात पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे. सोमवारी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार, तर मराठवाड्यात सोसाट्याच्या वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. 

वाऱ्याचा प्रवाह काहीसा मंदावल्याने राज्यात पावसाने उघडीप घेतली होती. येत्या आठवड्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतरही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. जवळपास 70 टक्‍क्‍यांहून अधिक महाराष्ट्र नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या शनिवारी तर विदर्भात गेल्या सोमवारी प्रगती केलेला मोसमी वारे अनुकूल वातावरण नसल्याने अद्याप पुढे सरकलेले नाहीत. 

दरम्यान, कोकण किनारपट्टीलगत हलक्‍या पावसाला सुरवात झाली आहे. अलिबाग, मालवण, दापोली, देवगड येथे पावसाने हजेरी लावली. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसाच्या हलक्‍या सरींनी पुणे आणि परिसरातही काही ठिकाणी शनिवारी हजेरी लावली. 
 

Web Title: The probability of rain in the coming weeks