बारामतीतील उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेमुळे अनेकांना मनस्ताप

मिलिंद संगई
शुक्रवार, 22 जून 2018

अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत तडजोड योग्य नाही ही बाब मान्य करतानाच नियोजन अभाव अनेक ठिकाणी दिसल्याने त्याचा मनस्ताप उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान अनेकांना झाला.

बारामती शहर - उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या बारामती दौऱ्यात पोलिसांनी सुरक्षेचा अतिरेक केल्याने त्याचा फटका अनेकांना सहन करावा लागला. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत तडजोड योग्य नाही ही बाब मान्य करतानाच नियोजन अभाव अनेक ठिकाणी दिसल्याने त्याचा मनस्ताप अनेकांना झाला.

विद्या प्रतिष्ठानमध्ये उपराष्ट्रपती माध्यमांशी संवाद साधणार होते. त्याचे पासेसही पत्रकारांना दिले होते. मात्र सुरक्षेच्या कारणावरुन पत्रकारांच्या दुचाकीही संकुलाच्या बाहेर पोलिसांनी लावायला लावल्या. त्या ठिकाणापासून विश्रामगृहाचे अंतर दोन कि. मी. असतानाही पत्रकारांनी चालत जाण्याची तयारी दर्शविली. मात्र त्यालाही पोलिसांनी नकार देत शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकारांना मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच थांबवून ठेवले.

शेवटी पत्रकारांनी बहिष्काराचा इशारा दिल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली व त्यांनी पोलिस गाडीतून विश्रामगृहापर्यंत सोडण्याचे कबूल केले. मात्र येथेही वरिष्ठ अधिकारी गायब होते व नियोजनच नसल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीप्रमाणे पत्रकारांना एका पिंजरा गाडीत बसवून विश्रामगृहापर्यंत नेल्याने पत्रकारांनी संताप व्यक्त केला. 

उपराष्ट्रपतींशी संवाद साधणे गरजेचे असल्याने या गाडीतून जाणे पत्रकारांनी नाइलाजाने मान्य केले. खरे मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून नियोजन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यातून अधोरेखित झाला. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: problem because of vice president venkaiah naidu in baramati meet