गटबाजीमुळे योजनांचा खेळखंडोबा नको - राष्ट्रवादी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पुणे - शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पाण्याच्या टाक्‍यांचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही बांधकाम सुरू करण्यासाठी आयुक्तांकडे आग्रह धरला आहे. भारतीय जनता पक्षातील गटबाजीमुळे शहराच्या हिताच्या योजनांचा खेळखंडोबा करू नका, असे आवाहनही राष्ट्रवादीने केले आहे.

राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने स्थगिती दिल्यामुळे पाण्याच्या 21 टाक्‍यांचे सुरू झालेले बांधकाम बंद पडले आहे. शहरात सुमारे 103 टाक्‍या बांधायच्या आहेत. 24 तास पाणीपुरवठा प्रकल्पासाठी टाक्‍यांचे बांधकाम अत्यावश्‍यक आहे; परंतु भाजपमधील अंतर्गत गटबाजीतून या बांधकामाला स्थगिती देण्यात आली आहे. महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना भाजपच्याच पुढाकाराने ही योजना राबविण्यात आली होती; परंतु सत्ताबदल झाल्यावर या योजनेचा ठेकेदार बदलण्यासाठी भाजपमधील काही जणांचे प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेसच्या काही नेत्यांचाही त्यात हात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, ""चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प शहरासाठी आवश्‍यक असल्यानेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून हा ठराव मंजूर केला होता. प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार न घेणारे घटक आता प्रकल्पाचे फायदे घेण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. महापालिका निवडणूक प्रचारात दिलेले आश्‍वासन भाजप अवघ्या महिनाभरातच विसरले आहे.'' माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम आणि प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, ""पाण्याच्या टाक्‍यांच्या बांधकामाला दिलेली स्थगिती टिकणारी नाही; परंतु या दिरंगाईमुळे योजनेचा खर्च वाढून त्याचा भुर्दंड पुणेकरांवर पडणार आहे, हे भाजपचे नेते विसरले आहेत का? शहर हिताचा भाजपला कळवळा कसा आहे, हे या योजनेतून दिसून आले आहे.''

दरम्यान, मनसेचे उपाध्यक्ष जयराज लांडगे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भाजपमधील राजकारणामुळे पुणेकरांचे नुकसान होऊ नये. पुणेकरांना 24 तास पाणी देऊ, असे आश्‍वासन देणारे पालकमंत्री गिरीश बापट यांनीच या योजनेचे काम बंद पाडले आहे. पक्षांतर्गत राजकारणामुळे पुणेकरांना वेठीस धरू नये.

जावयासाठी पुणेकरांना वेठीस धरू नका!
24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका पूर्वी होती आणि आजही आहे. योजनेचे काम रखडल्यास पक्षाचे कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी म्हटले आहे. भाजपमधील एका पुढाऱ्याच्या जावयाला योजनेचे काम मिळावे, यासाठीच या योजनेला स्थगिती देण्यात आली आहे, अशी चर्चा आहे. जावयाऐवजी पुणेकर महत्त्वाचे आहेत, हे भाजपने लक्षात घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: problem by grouing scheme