एकीकडे अवहेलना, तर दुसरीकडे पैसेही मिळेना;  कचरावेचक महिलांची समस्या

एकीकडे अवहेलना, तर दुसरीकडे पैसेही मिळेना;  कचरावेचक महिलांची समस्या

पुणे -  "तुम्ही कचरावेचक आहात, तुमच्या माध्यमातून कोरोना आमच्यापर्यंत येईल. त्यामुळे तुम्ही काम सोडा, नाहीतर घर'. कचरावेचक अंजना घोडके यांना त्यांच्या घरमालकाने असे दोन पर्याय दिले. शेवटी त्यांनी घर सोडण्याचा पर्याय निवडला आणि "स्वच्छ'द्वारे कचरा वेचण्याचे काम सुरू ठेवण्याचा निर्धार केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कचरावेचकांना अशा अनेक चांगल्या-वाईट अनुभवांना सध्या सामोरे जावे लागत आहे. त्यातच कोरोनामुळे नागरिक कचरा उचलण्याचे पैसेही (यूजर फी) देण्यास नकार देऊ लागल्याने "सांगा, आम्ही जगायचे कसे' असा प्रश्न ते उपस्थित करू लागले आहेत. 

अंजनाताई मागील 4-5 वर्षापासून "स्वच्छ' या संस्थेमध्ये हडपसर भागात घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचे काम करतात. त्यांच्या कामामुळे कदाचित त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याचा फटका आपल्यालाही बसेल, या उद्देशाने त्यांच्या घरमालकाने त्यांना निर्णय घ्यायला सांगितला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अंजनाताई  म्हणाल्या, ""घर दुसरीकडे मिळेलही पण काम केले नाही, तर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा ? शेवटी घर सोडायचे ठरवले. आता मुलीकडे राहतेय. थोड्या दिवसांनी ते घर सोडू.'' 

अंजनाताईप्रमाणे हजारो कचरावेचक महिला कोरोनाची पर्वा न करता कचरा उचलण्याचे काम करीत आहेत. हे काम करत असतानाच त्यांना अंजनाताईसारख्या अनेक प्रश्नांना दररोज तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्यात आणखी एका प्रश्नाने डोके वर काढले आहे. कचरावेचकांना कचरा उचलण्यासाठी एका घरामागे दरमहा मिळणारी "यूजर फी " झोपडपट्टी परिसरातून मिळत नसल्याची सद्य-स्थिती आहे. 

"स्वच्छ'च्या कचरावेचकांना कामापोटी प्रत्येक घर किंवा हॉटेल, रेस्टॉरंट येथून दरमहा 70 रुपये मिळतात. झोपडपट्टीत एका घरामागे 45 रुपये मिळतात. मात्र, कोरोनामुळे झोपडपट्टीतील बहुतांश कष्टकरी वर्गाच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कचरावेचकांना पैसे देण्यास नकार मिळत आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही कचरावेचकांकडे पूर्णपणे झोपडपट्टी परिसर येत असल्याने त्यांना दरमहा मिळणारे पैसेही मिळत नाहीत, त्यामुळे "काम केल्याचे पैसेच मिळत नसतील तर जगायचे कसे', असे प्रश्न कचरावेचक उपस्थित करीत आहेत. 

* कचरावेचकांची एकूण संख्या - तीन हजार 500 
* कचरा गोळा करण्यात येणाऱ्या घरासह मालमत्ताची संख्या - 8 लाख 
* झोपडपट्टीमध्ये कचरा गोळा करण्यात येणाऱ्या घरांची संख्या - दीड लाख ( 8 लाखांपैकी) 
* झोपडपट्टीतील एका घरामागे दरमहा मिळणारे पैसे - 45 रुपये 
* सोसायट्या व अन्य मालमत्तामधून दरमहा मिळणारे पैसे - 70 रुपये 

कचरावेचकांच्या समस्या 
* बससेवा नसल्याने घर ते कामाच्या ठिकाणापर्यंत 2-3 किलोमीटर पायी जावे लागणे 
* 60 ते 100 किलो वजन ढकलगाडीतून 1-2 किलोमीटरपर्यंतच्या फिडर पॉइंटवर घेऊन जाणे 
* यूजर फी व रिसायकलींगमधूनही पैसे मिळत नसल्याने उदरनिर्वाह भागवणे अवघड 
* रेशन मिळण्याची अडचण असल्याने खाण्या-पिण्याची आबाळ 

"स्वच्छ'कडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना 
* कचरावेचकांची वैद्यकीय तपासणी 
* मास्क, सॅनीटायझर, फेसशिल्ड, साबण आदींचे वाटप 
* विविध घटकांच्या मदतीने रेशन किट उपलब्ध 
* कचरावेचकांना अल्प प्रमाणात आर्थिक आधार देणे 

कचरावेचक असल्याने कोरोना होईल, या भीतीमुळे आमच्या एका कचरावेचकाला तिचे भाड्याचे घर सोडावे लागले आहे. कचरावेचक आपल्या जिवाची पर्वा न करता शहराचे आरोग्य सुधरवित आहे. असे असतानाही, कचरावेचकांना ते कचरा उचलत असलेल्या ठिकाणी "यूजर फी" दिली जात नाही. हा प्रश्न झोपडपट्टीमध्ये जास्त आहे. 
- सुचिस्मिता पै, जनसंपर्क अधिकारी, स्वच्छ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com