उच्चभ्रू पेठांना समस्यांचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पिंपरी - प्रशस्त रस्ते, अलिशान सोसायट्या, उच्चभ्रू राहणीमान अशी मोशी- प्राधिकरणातील पेठ क्रमांक चार ते सहामधील नागरिकांची ओळख. मात्र, अपुरा पाणीपुरवठा, कचरा डेपोची दुर्गंधी, अनियमित टपाल सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कमतरता आणि अस्वच्छतेमुळे डासांचा उपद्रव अशा विविध समस्यांनी येथील नागरिक त्रस्त आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिका आणि प्राधिकरणाकडून दुर्लक्ष होत असल्याने, दाद मागावी कुणाकडे अशी अवस्था आहे.

भोसरी व मोशीतील माळरान ताब्यात घेऊन पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सुनियोजित शहर वसविण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार प्रशस्त रस्त्यांची निर्मिती केली. वृक्षारोपण व सुशोभीकरण केले. ट्रॅफिक पार्क, आरटीओसाठी इमारती उभारल्या. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र व मध्यवर्ती सुविधा केंद्रासाठी जागा निश्‍चित केली. टोलेजंग इमारतींसह प्रशस्त बंगले उभे राहिले. राहण्यासाठी सुयोग्य जागा म्हणून अनेकांनी लाखो रुपये देऊन स्वप्नातील घर घेतले. मात्र, नव्याचे नऊ दिवस कधीच संपले आणि आम्हाला समस्यांनी ग्रासले, अशी प्रतिक्रिया अनेकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

कमी दाबाने पाणी
अशोक यादव, शिवाजी मराठा सोसायटी, पेठ क्रमांक चार - चोवीस तास पाण्यासाठी केवळ पाइप टाकले आहेत. प्रत्यक्षात दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नाही. कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. बोअरवेलचे पाणी वापरावे लागते.  

आरटीओमुळे तोटा 
संजय आहेर, उद्योजक - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (आरटीओ) या भागात आल्यामुळे फायद्याऐवजी तोटाच अधिक झाला आहे. आरटीओत येणारी वाहने रस्त्यातच उभी केल्याने रहदारीस अडथळा ठरतात.

मॉर्निंग वॉकला अडथळा
डॉ. अनु गायकवाड - येथील प्रशस्त रस्ते, पदपथ व मध्यवर्ती सुविधा केंद्राची जागा यामुळे मॉर्निंग वॉकसाठी गर्दी असते. मात्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांचा व्यायाम व मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना त्रास होतो.  

डासांचा उपद्रव
ॲड. सुजाता बिडकर - येथील मोकळ्या भूखंडांवर झाडेझुडपे व डासांचा उपद्रव वाढला आहे. टपाल कार्यालय या भागात नसल्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत. पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी. 

नियमित सफाई हवी
दिलीप जांभळे - स्पाइन रस्ता सुंदर व स्वच्छ असावा, यासाठी नियमित साफसफाई करावी. पीएमपीने बससेवा सुरू केल्यास शहराच्या अन्य भागात जाणे सोयीचे होईल.

Web Title: Problems in Moshi pradhikaran society