निर्मात्यांचे नैराश्‍य घालविणार "विचारमंथन शिबिर' 

स्वप्नील जोगी
गुरुवार, 18 मे 2017

पुणे - वरकरणी ग्लॅमरस दिसणारे आणि भरपूर पैसा मिळवून देणारे क्षेत्र म्हणून चित्रपटनिर्मिती क्षेत्र ओळखले जात असले, तरीही पैशांची वारेमाप उलाढाल होणाऱ्या या क्षेत्राला अनेकदा आर्थिक गोष्टींचाच मोठा फटका सहन करावा लागतो हे वास्तव नाकारता यायचे नाही. या आर्थिक फटक्‍यातून बाहेर पडू न शकणाऱ्या निर्मात्यांना नैराश्‍य येऊ नये तसेच नैराश्‍यातून त्यांच्या आयुष्याचे त्यांनी काही बरेवाईट करून घेऊ नये, यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुढाकार घेतला आहे. निर्मात्यांचे मनःस्वास्थ्य खंबीर राहावे, यासाठी महामंडळातर्फे आता राज्याच्या विविध भागांत विचारमंथन शिबिरे घेतली जाणार आहेत. 

चित्रपट व्यवसायात आलेल्या नुकसानीमुळे युवा चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांनी चार दिवसांपूर्वीच नैराश्‍येपोटी आत्महत्या केली. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवरच मंथन शिबिरे राबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी "सकाळ'ला बुधवारी दिली. चित्रपटनिर्मिती क्षेत्रात सध्या तरुण मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. तरुणांना या क्षेत्राच्या कठोर वास्तवाचीदेखील पुरेशी जाणीव असावी, यासाठी होणाऱ्या या शिबिरांत निर्मात्यांसह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सहभागी होतील. या महिनाअखेरीस पुण्यातून शिबिरांची सुरवात होईल. 

राजेभोसले म्हणाले, ""युवा निर्मात्यांमध्ये अनेकदा चित्रपटनिर्मितीचा आणि त्यातील अनेक बाजूंच्या व्यवस्थेचा अनुभव कमी असतो. त्यामुळे चुकीचे आर्थिक निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यातून नैराश्‍य येते. विविध घटकांकडून आपली आर्थिक फसवणूकही केली जाऊ शकते. हे गंभीर वास्तव ठाऊक असणे गरजेचे आहे. त्यासाठी या व्यवस्थेचा पुरेसा अभ्यास करूनच यात प्रवेश करायला हवा. प्रत्येक चित्रपट 100 कोटींचा व्यवसाय करू शकेलच असे नाही, याची जाणीव ठेवून आपली वाटचाल करायला हवी.'' 

आता गरज निर्मात्यांनी एकत्र येण्याची 
सध्याच्या काळात चित्रपटनिर्मितीचा खर्च कोट्यवधी रुपयांच्या घरात गेल्यामुळे कुणा एकट्याच निर्मात्याला चित्रपटनिर्मिती करणे जिकिरीचे ठरू शकते. ती आता एकेकट्याने करायची गोष्ट राहिलेली नाही. अशावेळी एकाच चित्रपटासाठी दोन-तीन निर्मात्यांनी एकत्र येत सामूहिक निर्मिती केल्यास हा खर्च वाटला जाऊ शकतो. शिवाय, आर्थिक नुकसानही विभागले जाऊ शकते, असे राजेभोसले यांनी अधोरेखित केले. मंथन शिबिरांत या संदर्भातही सखोल चर्चा केली जाणार आहे. 

तापकीर यांचे असे अचानक निघून जाणे धक्कादायकच होते. व्यावसायिक अपयशातून अतिशय कमी वयात त्यांना आलेले नैराश्‍य व त्यातून त्यांनी केलेली आत्महत्या हे चित्रपटनिर्मिती क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या तरुणांना अनेक बाबतीत सखोल विचार करायला भाग पाडणारे आहे. हे क्षेत्र दुरून जरी खूप पैसा मिळवून देणारे आणि ग्लॅमरने भरलेले दिसत असले, तरीही तो एक व्यवसाय असून, त्यात इतर व्यवसायांप्रमाणेच अनेक टप्प्यांवर जोखीम पत्करावी लागते याचे भानही असणे आवश्‍यक आहे. 
- मेघराज राजेभोसले 

Web Title: Producer depression