मराठी निर्माते-दिग्दर्शकांच्या मागे सेन्सॉरचा बागुलबुवा : प्रवीण तरडे

मराठी निर्माते-दिग्दर्शकांच्या मागे सेन्सॉरचा बागुलबुवा : प्रवीण तरडे

पुणे - रविवारचा दिवस, पुण्यातील नामांकित चित्रपट महोत्सव आणि त्यातही वर्षभरातील गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते व दिग्दर्शकांचा परिसंवाद... उसळलेली गर्दी, एकावर एक प्रश्न आणि रंगलेल्या गप्पा... अशा चित्रमय वातावरणात ‘पिफ’चा तिसरा दिवस पार पडला.

पिफ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व लीड मीडिया यांच्या समन्वयाने पिफच्या तिसऱ्या दिवशी ‘२०१८ मधील मराठी चित्रपटांचे यश’ या परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, अभिनेते- दिग्दर्शक- लेखक प्रवीण तरडे, झी स्टुडिओचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, दिग्दर्शक विशाल देवरूखकर, निर्माते संदीप जाधव, निर्माते राजेंद्र शिंदे, सिटी प्राइडचे मालक प्रकाश चाफळकर व एबीपी माझाचे एंटरटेन्मेंट हेड सौमित्र पोटे उपस्थित होते. लीड मीडियाचे विनोद सातव यांनी कलाकारांशी संवाद साधला. 

मराठी चित्रपटाची कथा, त्याचे वेगळेपण, त्याचे दिग्दर्शन, निर्मात्यांची कसरत, चित्रपटाचे वितरण, थिएटरमध्ये जास्तीत जास्त शो लागावे यासाठीची धडपड व या सगळ्या अडथळ्यांना पार करून, मराठी चित्रपटांनी मिळवलेल्या यशाच्या पैलूंबाबत परिसंवादात चर्चा झाली. 

तरडे म्हणाले, ‘‘आमच्या कलेला कात्री लावणारे हे सेन्सॉरवाले कोण? आमची मेहनत आहे, लोकांनी, सरकारने नव्या प्रेक्षकांना, वेगळ्या भाषेला, वेगळ्या कंटेंटला स्वीकारायला हवं. मी सिनेमा बनवताना निर्मात्याची काळजी घेतो.’’  

निर्माता जगला तरच पुढचा मराठी सिनेमा बनणार, त्यामुळे निर्मात्यांची काळजी सिनेमा बनवताना घेतलीच पाहिजे. शिवाजी महाराजांवर आणि त्यात लढाईपट करताना बजेट खूप होतं. कुठे खर्च कमी करता येईल, हे मी नेहमी पाहत आलो, असे ‘फर्जंद’चे दिग्दर्शक लांजेकर यांनी सांगितले. 

आम्ही सिनेमा निर्मित करताना आणि प्रदर्शित करताना, तो कुटुंबातील सर्वजण पाहू शकतील ना, याचा विचार करतो. आमची आगामी वर्षात किती सिनेमे बनवायचे, याची तयारी आदल्या वर्षीपासूनच सुरू होते, असे मंगेश कुलकर्णी यांनी सांगितले. 

कऱ्हाडे म्हणाले, ‘‘पिफमुळे माझ्या चित्रपटाला ओळख मिळाली, त्यामुळे मी नंतर माझा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित करू शकलो.’’ 

हिंदी चित्रपटांमुळे नक्कीच कमाईवर फरक पडतो; पण मराठी सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होणंसुद्धा तितकंच कारणीभूत आहे. या वर्षी मराठी चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना थिएटरमधून खाली खेचलं, हे पाहणं आनंददायक ठरलं, असे संदीप जाधव यांनी सांगितले.  

कोणत्याही निर्मात्याचा चित्रपटात सहभाग हवा, पण ढवळाढवळ नको. चित्रपटाच्या प्रक्रियेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत बॉईज २ चे निर्माते राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केले. 

चाफळकर म्हणाले, ‘‘थिएटर मालक हा दुकानदार असतो, जे टिकतं तेच विकल जातं. पण मराठी चित्रपटाच्या प्रगतीसाठी आम्ही कायमच प्रोत्साहन देत आलो आहोत व नेहमीच देऊ.’’  

मराठी चित्रपटांसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ काही दिवसांतच चित्रपटांचे वितरण करण्यात सक्रिय होईल. तसेच, मराठी दिग्दर्शक व निर्माते यांचे लवकरच डिजिटायझेशन करणार.
- मेघराज राजेभोसले,  अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com