नरेंद्र चपळगावकर यांना 'प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान' जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाला आहे.

पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १६ जुलै रोजी (सोमवार) सायं. ६.०० वाजता एस एम जोशी फाऊंडेशन सभागृह येथे होणाऱ्या समारंभात राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधुताई सपकाळ, प्रा द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 

संस्थेतर्फे प्रतिवर्षी श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान केला जातो. श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेल्या फलटणच्या स्वयंसिद्धा कल्चरल ग्रुपच्या संस्थापक ऍड. मधुबाला दिलीपसिंह भोसले आणि सासवडच्या आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांचा यावर्षी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 

प्रा. जोशी म्हणाले, "महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यानिधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीची स्थापना करण्यात आली. आपल्या अमोघ आणि विचारसंपन्न वक्तृत्वाच्यामाध्यमातून समाजमानस समृद्ध करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्रतस्थ वृत्तीने काम करणाऱ्या माणसांविषयी प्राचार्यांना विलक्षण आदर होता. पाच दशकाहून अधिक काळ व्रतस्थ वृत्तीने आणि निष्ठेने माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून विचारजागर केला. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या विषयी विशेष आपुलकी होती. हा स्नेहानुबंध आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी विचारजागर करण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाला अभिवादन करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचे समितीने ठरविले आहे." फलटणच्या स्वयंसिध्दा कल्चरल ग्रुपच्या माध्यमातून ऍड. मधुबाला भोसले यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. ऍड. मधुबाला भोसले या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या विद्यार्थिनी आहेत .

१८ वर्षांपूर्वी त्यांनी फलटणला शिवाजीराव भोसले सरांच्या प्रेरणेने स्वयंसिध्दा व्याख्यानमाला सुरु केली. त्यांच्या निधनानंतर या व्याख्यानमालेचे प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यानमाला असे नामकरण करण्यात आले आहे. विजय कोलते यांनी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सासवड आणि परिसरातल्या ग्रामीण भागात अनेक उपक्रमातून श्रवण संस्कृती समृद्ध करण्यासाठी योगदान दिले आहे. गेली २० वर्ष आचार्य अत्रे साहित्य संमेलनाचे ते आयोजन करीत आहेत. सासवडला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. श्रवण संस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल या दोघांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof. Shivajirav Bhosale smruti sanman award declared to narendra chapalgavakar