व्यावसायिकांनीच अडवला रस्ता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

रास्ता पेठेतील स्थिती; नागरिकांची कोंडी

पुणे - तुमच्या घराच्या आजूबाजूचा रस्ता तिथल्या व्यावसायिकांनीच अडविला, वाहने विकणाऱ्या दुकानांसमोर गाड्या वेड्यावाकड्या पद्धतीने लावून तुमचे येणे-जाणे मुश्‍कील केले तर?... आणि याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तुम्हालाच पोलिस ठाण्यात चोप मिळत असेल तसेच ज्यांच्याविरोधात तक्रार आहे, त्यांची कृत्ये कायदा पायदळी तुडवत तशीच सुरू असतील तर?...

रास्ता पेठेतील स्थिती; नागरिकांची कोंडी

पुणे - तुमच्या घराच्या आजूबाजूचा रस्ता तिथल्या व्यावसायिकांनीच अडविला, वाहने विकणाऱ्या दुकानांसमोर गाड्या वेड्यावाकड्या पद्धतीने लावून तुमचे येणे-जाणे मुश्‍कील केले तर?... आणि याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तुम्हालाच पोलिस ठाण्यात चोप मिळत असेल तसेच ज्यांच्याविरोधात तक्रार आहे, त्यांची कृत्ये कायदा पायदळी तुडवत तशीच सुरू असतील तर?...

याची उत्तरे कशी शोधायची आणि पोलिसच दुर्लक्ष करीत असतील तर दाद तरी कुणाकडे मागायची या प्रश्‍नांमध्ये रास्ता पेठेतील रहिवासी अडकून पडले आहेत. रास्ता पेठेतील पंडित जवाहरलाल नेहरू रस्त्यावरील पॉवर हाउस चौक, गुंदेचा चौक आणि दीनबंधू चौक परिसरात जुन्या दुचाकींची बाजारपेठ आहे. त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. परिसरात तितकीच दाट लोकवस्तीही आहे. रहिवाशांच्या सोयीकरिता, रस्त्यावर पदपथ उभारले आहेत. पण, येथील व्यवसायाच्या विस्तारात म्हणजे, अतिक्रमणामुळे ते गायब झाले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सकाळपासून बेकायदा दुचाकी उभ्या केल्या जातात. त्याही तीन समांतर रांगांमध्ये असतात. त्यामुळे रहिवाशांना रस्ता ओलांडणे सोडा, पण आपल्या सोसायटीबाहेर साधा पायही ठेवता येत नसल्याची येथील स्थिती आहे. पदपथ, वाहतुकीचा रस्ता आणि सोसायट्यांसमोरील जागाही व्यावसायिक ‘गिळंकृत’ करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यावर ‘आमचा रस्ता चोरला जातोय’, अशी रहिवाशांची प्रतिक्रिया आहे. ती तितकीच वस्तुस्थितीला धरून असल्याचेही परिसरात फेरफटका मारल्यानंतर जाणवते.   

येथील दत्त क्‍लब भागातील नवले रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जुन्या दुचाकी विक्रीची दुकाने आहेत. दुकानांच्या मागील बाजूस मोठमोठ्या सोसायट्या आहेत. नागरिकांची वर्दळ, पदपथ व त्या लगतच्या रस्त्यावरील अतिक्रमण यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करता येत नाही. येथील एका पाच बाय दहा फूट जागेतील दुकानासमोर तब्बल १३ दुचाकी उभ्या असल्याचे पाहणीत दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरून चालायचे कसे?, असा प्रश्‍न निर्माण होतो.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
दुचाकींच्या या बाजारपेठेपासून वाहतूक पोलिसांचे मुख्यालय काही अंतरावर आहे. परंतु व्यावसायिक रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याची त्यांना पर्वाही नसते. ही वाहने उचलण्याकरिता पोलिसांची वाहने फिरत असतात. मात्र, येथील व्यावसायिकांकडे त्यांचे ‘जाणीवपूर्वक’ दुर्लक्ष होत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. वारंवार तक्रारी करूनही वाहने उचलली जात नाहीत, अशी तक्रार विजय नायर, सुनील जगताप, अजित दोशी या रहिवाशांनी केली. दरम्यान, याबाबत महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे नगरसेवक वनराज आंदेकर यांनी सांगितले.

Web Title: Professional way of obstructing road