सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

अपवादात्मक संस्थांच्या निवडणुका
ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत; त्याच संस्थांच्या निवडणुका सद्यःस्थितीतही घेतल्या जाणार आहेत.

पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सुमारे वीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी काढला आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम तरतुदीनुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर आहे. मार्च महिन्यात काही सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यातील अ, ब, क आणि ड या सर्व वर्गवारीमधील सहकारी संस्थांच्या निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता या निवडणुका ३१ मे नंतरच घेतल्या जाणार आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्च रोजी लागू झाली आहे. त्यानंतर एक महिन्याने शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याने आश्‍चर्य होत आहे. याबाबतचा आदेश लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेच काढणे आवश्‍यक होते. मात्र, हा निर्णय घेण्यास शासनाने का उशीर लावला, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Prolonged Elections for Co-operative Societies