प्रचार साहित्याची कोटींची उड्डाणे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

पुणे - बॅनर, बिल्ले, झेंडे, टोप्या, दुपट्टा अन्‌ फ्लेक्‍स अशा विविध प्रचार साहित्यामुळे सध्या अवघी बाजारपेठच रंगीबेरंगी झाली आहे. निवडणुकीमुळे प्रचार साहित्यालाही भलताच "भाव' चढला असून, आत्तापर्यंत दोन-तीन कोटी रुपयांच्या साहित्याची विक्री झाली असून, ही उलाढाल आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांकडूनही प्रचार साहित्य खरेदीला पसंती दिली जाऊ लागली आहे. 

महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच प्रचार साहित्य खरेदीला सुरवात झाली होती; मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापासून आणि चिन्हवाटपानंतर या खरेदीला खरी पसंती मिळू लागली. प्रचार साहित्याच्या दुकानांमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी होत असून, दिवसाला किमान तीन ते चार उमेदवार साहित्य खरेदी करत आहेत. शहरातील रविवार पेठ, भवानी पेठ, लष्कर, खडकी या बाजारपेठांमध्ये साहित्य खरेदी केली जात आहे. मोठ्या पक्षांचे साहित्य हे मुंबई, दिल्लीहून मागविले जात आहे, तर काही पक्षांचे प्रचार साहित्य पुण्यात तयार केले जात आहेत. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन समाज यांसारख्या पक्षांच्या प्रचार साहित्याला सर्वाधिक मागणी आहे. प्रस्थापित पक्षांच्या साहित्याची चांगली विक्री होत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. 

विक्रेते पंकज सारडा म्हणाले, ""तिकीट वाटपाला उशीर झाल्याने काही दिवसांपूर्वी उमेदवार संभ्रमात होते. त्यानंतर मात्र खरेदीला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.'' 

प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचार साहित्याला मोठी मागणी आहे. त्या दृष्टीने दुकानांमध्ये साहित्य उपलब्ध केलेले आहे. झेंडे, टोप्या, बॅचेस, रंगीत स्टिकरला मागणी आहे. 
- कलविंदर सिंग, व्यावसायिक 

हे आहे प्रचार साहित्य 
पक्षचिन्ह असलेले बिल्ले, फायबरची चिन्हे, टोप्या, उपरणे, दुपट्टे, झेंडे, पताका, टी-शर्ट, तोरण, स्टिकर, की-चेन, बिल्ले यांसारख्या असंख्य प्रकारच्या प्रचार साहित्यास मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यांची किंमत 50 रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत आहे, तर पक्ष चिन्हांची टी-शर्ट 50 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

Web Title: promotion materials