प्रॉपर्टी कार्ड लवकरच पडणार हातात 

प्रॉपर्टी कार्ड लवकरच पडणार हातात 

पुणे - गृहप्रकल्पातील प्रत्येक सदनिकाधारकाला महत्त्वाचा पुरावा ठरणारे प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भात सरकारकडून तयार करण्यात आलेल्या नियमावलीवर हरकती व सूचना मागविण्याची मुदत आज संपुष्टात आली. दाखल हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन लवकरच त्याबाबतची अंतिम नियमावली राज्य सरकारकडून मंजूर करण्यात येणार आहे. त्यानंतर याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. 

सदनिकांच्या बाबतीत मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी महापालिकेकडे कर भरल्याची पावती आणि खरेदी-विक्री करारनामा एवढाचा दस्त उपलब्ध असतो. ज्या जागेवर इमारत उभारली आहे त्या जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर मात्र गृहनिर्माण सोसायटी अथवा अपार्टमेंटची नोंद असते. तसेच, सर्व सदनिकाधारकांची एकत्रित नावे त्यावर असतात. त्यामुळे एका व्यक्तीने कर्ज घेतले, तरी प्रॉपर्टी कार्डवर इतर हक्कामध्ये याचा उल्लेख असतो. त्यामुळे हा बोजा प्रॉपटी कार्डवर नोंदविण्यात येतो. त्यामुळे काही वेळेस त्याचा त्रास बाकीच्या सदस्यांनाही सहन करावा लागतो. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर व्हर्टिकल इमारतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाकडून तयार करण्यात आला होता. मुख्य प्रॉपर्टीव्यतिरिक्त प्रत्येक सदनिकाधारकास पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याची शिफारस त्यामध्ये करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकाकरडे मंजुरीसाठी पाठविला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास राज्य सरकारकडून मध्यंतरी मान्यता देण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारकडून या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली होती. त्यावर नागरिकांकडून हरकती सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यांची मुदत आज संपुष्टात आली. शंभरहून अधिक हरकती या प्रस्तावावर दाखल झाल्या आहेत. त्यांची सुनावणी घेऊन अंतिम नियमावली करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. 

त्यामुळे एखाद्या गृहप्रकल्पातील अथवा सोसायटीतील ज्या सदनिकाधारकाने सदनिका तारण ठेवली असेल अथवा त्यावर कर्ज घेतले असेल, त्याची नोंद पुरवणी प्रॉपर्टी कार्डवर घेतली जाणार आहे. प्रत्येक सदनिकेचे प्रॉपर्टी कार्ड वेगळे मिळणार असल्याने कोणत्या सदनिकेवर कर्ज आहे, याचा मालक कोण, यापूर्वीचे मालक, सदनिकेचे नेमके क्षेत्रफळ, अन्य स्वरूपाचा बोजा, अशा सर्व बाबींची नोंद त्या प्रॉपर्टी कार्डावर होणार आहे. यामुळे खरेदीदार व्यक्तीला याची माहिती मिळणार असल्यामुळे त्यांची फसवणूक टळण्यास मदत होणार आहे. 

काय फायदा होणार... 
प्रॉपटी कार्ड हे महसूलविषयक महत्त्वाचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने सदनिकाधारकाचे हितसंबंध जोपासले जाणार आहेत. प्रॉपर्टी कार्डवर जागेच्या आणि सदनिकेच्या सर्वच नोंदी असणार आहेत. तसेच, सदनिकेची खरेदी-विक्री करताना उद्गभवणारे वाद मिटणार आहेत. एकच सदनिका वेगवेगळ्या बॅंकेकडे गहाण ठेवून त्यावर कर्ज उचलण्याच्या प्रकारालादेखील आळा बसणार आहे. 

या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यावर हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यासाठीची मुदत आज संपली. लवकरच या नियमावलीला अंतिम स्वरूप देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. 
- किशोर तवरेज, उपसंचालक, भूमी अभिलेख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com