
कसबा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत पराभव झाल्याने राज्य सरकारचे डोळे उघडल्याने मिळकतकराची ४० टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
MLA Ravindra Dhangekar : कसब्यातील पराभवामुळेच मिळकतकराच्या सवलतीचा निर्णय
पुणे - कसबा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत पराभव झाल्याने राज्य सरकारचे डोळे उघडल्याने मिळकतकराची ४० टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा शब्दात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर टीका केली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, संजय बालगुडे उपस्थित होते. रवींद्र धंगेकर म्हणाले, १९७० पासून पुणेकरांना मिळकतकरात ४० टक्के सवलत मिळत होते. ही सवलत बंद झाल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी लढत होते. त्या लढ्याला यश आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सवलत लागू करण्याचा निर्णय घेतला. शहरात सुमारे दहा लाख मिळकती असून त्या सर्व मिळकतदारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महापालिका कर वसूल करते, पण सुविधा मिळत नसल्याने नागरिक टीका करत आहेत. यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी मी नगरसेवक असताना सभागृहात करत होतो. आता आमदार झाल्यानंतर हीच मागणी विधिमंडळात केली होती. त्या मागणीला यश आले आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचे डोळे उघडल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
त्याचप्रमाणे आता मुंबई महापालिकेप्रमाणे पुण्यातील ५०० चौरस फुटाचे घर असणाऱ्या मिळकतधारकांचा कर माफ करावा अशी मागणी विधिमंडळात करणार आहे. ही मान्य न केल्यास याविरोधात शहरात आंदोलन करू, अशा इशारा धंगेकर यांनी दिला.