मालमत्ताकरावरून पालिकेत गदारोळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

शहरातील जुन्या सदनिकाधारकांनाही वाढीव दराने २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून मालमत्ताकर भरावा लागणार आहे. महापालिकेच्या बुधवारी (ता. २६) झालेल्या सभेत याला मंजुरी देण्यात आली.

पिंपरी - शहरातील जुन्या सदनिकाधारकांनाही वाढीव दराने २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून मालमत्ताकर भरावा लागणार आहे. महापालिकेच्या बुधवारी (ता. २६) झालेल्या सभेत याला मंजुरी देण्यात आली. या विषयावर बोलू न दिल्याने संतप्त झालेले शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी काचेचा ग्लास फोडला. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौर उषा ढोरे यांनी पाणीपट्टीवाढीचा विषय वगळता बहुतेक सर्व विषय केवळ पाच मिनिटांत मंजूर करीत सभा गुंडाळली. या निर्णयावर विरोधकांनी जोरदार रान उठविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सत्तारूढ पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल नामदेव ढाके यांचे सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. त्यानंतर सभेला सुरवात झाली. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘१९९०-९१ मध्ये करयोग्य मूल्य प्रतिचौरस फूट ५.४० रुपये तर २०१५-१६ मध्ये २९.९४ रुपये होते. जुन्या इमारतींना लागू करण्यात आलेले मिळकतकराचे दर नवीन मिळकतींच्या तुलनेत वाढविण्यात आलेले नव्हते. या दोन्हींच्या मिळकतकराच्या दरातील फरक जास्त होता. नव्या इमारतींप्रमाणेच जुन्या इमारतींनाही हा कर २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. मात्र, तो सरसकट लागू न करता संबंधित जुनी इमारतीच्या आयुष्याच्या घसाऱ्यानुसार आकारण्यात येईल. शून्य ते दोन वर्षांपर्यंतच्या इमारतींना शून्य टक्के, तीन ते पाच वर्षे जुन्या इमारतींना पाच टक्के तर २१ ते ३० वर्षे जुन्या इमारतींना ३० टक्के घसारा लागू होईल.’’ 

या दरवाढीवरून सभेत चांगलीच वादळी चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘या विषयाला २० फेब्रुवारीच्या आत मंजुरी देणे आवश्‍यक होते, हे माहिती असताना गेल्याच सभेत या विषयावर चर्चा न करता सभा का तहकूब करण्यात आली? त्यामुळे मालमत्ता कराची वाढ भाजपला न करता आयुक्तांमार्फत करायची होती का?’’ नव्या मिळकतकरामुळे एखाद्याचा मिळकतकर वार्षिक ४५०० रुपये असेल तर तो आता थेट ११ हजार रुपये होईल.

‘तर कलाटे यांना निलंबित करू’
राहुल कलाटे यांनी ग्लास फोडल्याच्या घटनेचा निषेध करीत भाजपच्या नगरसेविकांनी कलाटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. कलाटे हे शिवसेनेचे गटनेते असून त्यांना असे वर्तन करणे शोभत नाही. त्यांनी ढोरे यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘‘कलाटे यांच्याकडून पुन्हा असे वर्तन घडल्यास त्यांना निलंबित करण्यात येईल.’’ कलाटे म्हणाले, ‘‘ढोरे यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, त्या महापौर म्हणून काम करताना सभागृहात बोलू देत नाहीत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सांगण्यानुसार त्या वागतात. मालमत्ताकराविषयी राज्य सरकारकडे तक्रार करणार आहे.’’

याचिका दाखल करणार
बाबू नायर यांनी भाजपतर्फे यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. तसेच सत्तारूढ आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना विश्‍वासात न घेता प्रशासनाने हा विषय मांडल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आशा शेंडगे, शत्रुघ्न काटे, सचिन चिखले, योगेश बहल, सीमा सावळे आदी सदस्यांनीही या दरवाढीस विरोध केला. या सभेत अ, ब आणि क प्रभागासाठी वाहनांच्या पार्किंगसाठी आता नागरिकांना शुल्क मोजावे लागणार आहे. या विषयालाही सभेने मंजुरी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Property tax PCMC