‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

पुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी बॅंकेकडे विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. हे विलीनीकरण झाल्यास रुपी बॅंकेच्या हजारो खातेदार, ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी बॅंकेकडे विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. हे विलीनीकरण झाल्यास रुपी बॅंकेच्या हजारो खातेदार, ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रुपी बॅंकेचे सारस्वत किंवा अन्य सक्षम बॅंकेत विलीनीकरण करण्याचे प्रयत्न सुरू होते. काही वर्षांपूर्वी सारस्वत बॅंकेने याबाबत रिझर्व्ह बॅंकेकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, त्यावर काही निर्णय होऊ शकला नाही. गेल्या काही महिन्यांत रूपीच्या विलीनीकरणासाठी कोणत्याही सक्षम बॅंकेचा प्रस्ताव आला नाही. त्यामुळे रुपी बॅंकेच्या पुनरुज्जीवनाला परवानगी मिळावी, अशी मागणी रुपीच्या प्रशासकीय मंडळाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे केली होती. रुपीच्या निर्बंधांना आरबीआयने तीन महिन्यांची, ३१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. चालू वर्षात ऑगस्टअखेर १७ कोटी रुपयांची कर्जवसुली झाली आहे. मार्च २०१९ पर्यंत ५५ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

रुपीच्या प्रशासकीय मंडळाच्या प्रयत्नांमुळे थकीत कर्जवसुली परिणामकारकरीत्या होत आहे. परंतु, सक्षम बॅंकेचा प्रस्ताव आल्यास विलीनीकरणाबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे रुपीचे प्रशासक सुधीर पंडित यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, राज्य बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी रुपी बॅंकेकडून विलीनीकरणाचा प्रस्ताव आल्याचे सांगितले.

यासंदर्भात अनास्कर म्हणाले, की राज्यातील अडचणीतील नागरी सहकारी बॅंकांच्या  विलीनीकरणासाठी राज्य सहकारी बॅंकेकडून उपविधीत काही बदल करण्यात आले आहेत. यापुढील काळात नागरी बॅंका विलीनीकरण करून घेणे, त्यांना मदत करणे किंवा त्या चालविण्यास घेण्याची उपविधीत तरतूद केली आहे. उपविधीत दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. 

काही नागरी बॅंकांचे विलीनीकरणाचे प्रस्ताव राज्य बॅंकेकडे प्राप्त झाले आहेत. रुपी सहकारी बॅंकेने विलीनीकरणाचा आग्रह धरला आहे. याबाबत अभ्यास करून आणि राज्य सरकारशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. 
- विद्याधर अनास्कर, प्रशासक, राज्य सहकारी बॅंक

रुपी बॅंकेने राज्य बॅंकेकडे विलीनीकरणाचा प्रस्ताव नुकताच दिला आहे. बॅंकेत ज्येष्ठ ठेवीदारांची संख्या अधिक आहे. बॅंकेतील सर्वच ठेवीदारांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. रुपी बॅंकेचे राज्य बॅंकेत विलीनीकरण झाल्यास आमच्या दृष्टीने ती समाधानाची बाब असेल.
- सुधीर पंडित, प्रशासक, रुपी सहकारी बॅंक 

बॅंकेची स्थिती 
५.१५ लाख - खातेदार-ठेवीदार
१३१४ कोटी - रुपयांच्या ठेवी
३१०कोटी - थकीत कर्ज
२४४२ - कर्जदार संख्या

Web Title: Proposal for merger of rupee cooperative bank in Maharashtra State Co-operative Bank